‘रायगड’ परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:46 AM2021-04-03T01:46:33+5:302021-04-03T01:47:34+5:30

किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे.

Work to solve the water problem of the villages in ‘Raigad’ area, work through Naam Foundation | ‘रायगड’ परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम

‘रायगड’ परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम

Next

दासगाव : किल्ले रायगडाचा विकास रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचादेखील विकास हातात घेण्यात आला आहे. या गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता एक आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या परिसरात नियोजनबद्ध काम करताना शासकीय अधिकारी
आणि स्थानिक रहिवाशांची भूमिका मोलाची ठरणार असल्याचे प्रतिपादन केले.
किल्ले रायगड परिसरातील २१ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. याकरिता पाचाड येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, खा. युवराज संभाजीराजे, खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आ. अनिकेत तटकरे, माजी आ. माणिकराव जगताप  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी खासदार युवराज संभाजीराजे यांनी गडावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांची माहिती देत परिसरातील २१ गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी या गावातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन आधुनिक तंत्रज्ञान वापर करत शिवकालीन जलस्रोत पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवकाळातील नैसर्गिक स्रोत आणि त्यांना शासकीय योजनांचा आधार देत परिसरातील पाणी समस्या सोडवता येईल, असे स्पष्ट केले, तर किल्ले रायगड परिसरात असलेली गावे ही विविध वाड्यांमध्ये विखुरली आहेत. यामुळे विविध योजना राबवताना अडचणी येतात. मात्र, नाम फाउंडेशनच्या कामात आपला सहभाग असेल, असे सांगितले. 

शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत 
यावेळी मकरंद अनासपुरे यांनीदेखील शिवकालीन पिण्याच्या पाण्याचा स्रोत शोधून तो पुनरुज्जीवित करणे हे नामचे काम असून, पाण्याबरोबर या परिसरात प्रत्येक पर्यटकाने आणि शिवभक्ताने एक झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे, असे आवाहनदेखील केले. नाना पाटेकर यांनी कोणतेही काम करताना जात, धर्म आणि पक्ष सोडून काम केले पाहिजे, असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत काम करण्याचे भाग्य लाभल्याने सुरुवातीस दोन गावांतील पाणी प्रश्न तडीस नेऊ, असे सांगितले. किल्ले रायगड परिसरात काल जलविद्युत प्रकल्प भूमिपूजन आपण केले असून, अद्याप तो पूर्ण झाला नसल्याने परिसरातील पाणी प्रश्न कायम असल्याचे माजी आमदार माणिकराव जगताप यांनी सांगितले.

Web Title: Work to solve the water problem of the villages in ‘Raigad’ area, work through Naam Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.