अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 01:11 AM2021-02-20T01:11:55+5:302021-02-20T01:12:17+5:30

Raigad : होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.

Untimely hit fishermen, boats reach shore; Suffering from climate change | अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

Next

मुरुड : गुरुवारी रात्री १०. ३० नंतर मुरुड तालुक्यात जोरदार वारे सुटल्यामुळे येथील नागरिक भयग्रस्त झाले होते. तर शुक्रवारी सकाळी सूर्यदर्शन झालेच नाही. ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या होड्यांनी पुन्हा किनारा गाठला आहे. ढगाळ वातावरणाचा फटका मच्छीमारांना सहन करावा लागला आहे.
होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते.
मुरुड तालुक्यासह रोहा, बारशीव व अन्य ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीने पाऊस पडला आहे. बहुतांशी भागातील होड्या किनाऱ्याला लागलेल्या आढळून आल्या आहेत. तर काही बोटींनी मुंबई येथे आसरा घेतला आहे. हवामान खात्याने पहिलेच अंदाज व्यक्त केला होता त्याप्रमाणे अवकाळी पाऊस काही भागात पडला तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. हेच वातावरण पुढे आठ ते दहा दिवस राहिल्यास मच्छीमारांचे मोठे हाल होणार आहेत. खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी तुटपुंजी सापडत असल्याने बोटीवर होणार खर्चसुद्धा निघत नाही. त्यातच डिझेलचे वाढते भाव व रेशनिंगचे वाढलेले भाव यामुळे मच्छीमारांची स्थिती चिंताजनक झाली आहे. मच्छीमार मासळी पकडण्या व्यतिरिक्त इतर कोणतेही काम करीत नाहीत. केवळ मासळी पकडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. अन्य मार्गाने कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने केवळ मासळीवरच त्यांचे जीवन अवलंबून आहे.
शासनाकडून अद्यापर्यंत डिझेल परतावा रक्कमसुद्धा अदा करण्यात आलेली नाही. क्यार व चक्री वादळाची मदतसुद्धा काही मच्छीमार सोसयट्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सध्या मच्छीमार अनेक संकटावर मात करून जीवन कसेबसे जगत आहेत.

सनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी
रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांच्याशी संपर्क साधला असता हवामान खात्याने अगोदरच सूचना केली होती. त्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील काही भागात तुरळक पाऊस व ढगाळ वातावरण राहिले आहे. काही भागात जोरदार वारेसुद्धा वाहिले आहेत. त्यामुळे मच्छीमार बोटींनी जिथे मिळेल तिथे आसरा घेतला आहे. मासेमारीची आता फक्त तीन महिने बाकी राहिले आहेत. येणाऱ्या तीन महिन्यात मासळी मुबलक प्रमाणात मिळणे खूप गरजेचे आहे. जून महिन्यापासून मासेमारी बंद असते. अशावेळी आगामी तीन महिन्यावर मच्छीमारांचे जीवन निर्भर असणार आहे. शासनाकडून मिळणारी मदत ही फारच तुटपुंजी व वेळखाऊ असणारी असते. आता तरी शासनाने मच्छीमारांना विशेष पॅकेज जाहीर करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली आहे.

Web Title: Untimely hit fishermen, boats reach shore; Suffering from climate change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड