रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर पनवेलच्या एमजीएममध्येच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 11:36 PM2020-05-30T23:36:30+5:302020-05-30T23:36:36+5:30

आदिती तटकरे : अलिबाग, महाड, माणगावमध्ये संशयितांवर उपचार

Treatment of patients in Raigad district at MGM, Panvel | रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर पनवेलच्या एमजीएममध्येच उपचार

रायगड जिल्ह्यातील रुग्णांवर पनवेलच्या एमजीएममध्येच उपचार

Next

आविष्कार देसाई।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोरोनाबाधित तसेच अत्यावस्थ रुग्णांवर आता पनवेल येथील एमजीएम रुग्णालयातच उपचार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माणगाव या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित आणि कोरोनाचा कमी त्रास असणाऱ्या रुग्णांना ठेवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.


लॉकडाउननंतर कोकणामध्ये सुमारे सात लाख नागरिक आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रायगड जिल्ह्यामध्ये आले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लाखोंच्या संख्येने नागरिकांनी आपापले घर गाठले. बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कोविड-१९ रुग्णालये (डीसीएच), कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि कोविड उपचार केंद्र (सीसीसी) अशा आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत.


कोरोनाबाधितांवर उपचार करताना आता वर्गीकरण करण्यात येणार आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पनवेल, एमजीएम यासह अन्य ठिकाणी रुग्णांना घरी सोडण्यात येत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सापडणाºया रुग्णांवर विशेषत: ज्यांची प्रकृती अस्वस्थ आहे आणि ज्यांना कोरोना झाला आहे. त्यांच्यावर पनवेल, एमजीएम येथे उपचार करण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, महाड, माणगाव या ठिकाणी फक्त कोरोना संशयितांनाच भरती करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
कोरोनाबाधितांवर उपचार करताना जे कोणी आरोग्य कर्मचारी त्यांच्या संपर्कात येणार असतील, त्या सर्र्वांना पीपीई किट, हॅण्डग्लोव्हज्, मास्क अशा आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याबाबत आधीच सूचना दिलेल्या आहेत. याबाबत आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना दिल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचा कामास नकार
अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयातील विलगीकरण कक्षातील दोन वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाल्याने अन्य कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संरक्षण साधन दिल्यावरच काम करू, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. प्रमोद गवई यांनी कर्मचाºयांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र त्यानंतर थेट आयुक्तांच्या व्हीसीमध्ये निघून गेले. त्यांनीच पोलिसांना पाचारण केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला. याबाबत डॉ. गवई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी व्हीसीमध्ये असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने आलेल्या नागरिकांमुळे धोका वाढण्याची शक्यता गृहीत धरून ४ हजार ६०० खाटांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु याची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला. बाहेरून आलेल्या बहुतांश नागरिकांनी आतापर्यंत
१४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. १६ मेनंतर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आलेल्यांवर विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याने पुढील आठ दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Web Title: Treatment of patients in Raigad district at MGM, Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.