Tatkare denies news of Shiv Sena joining, 'I am MP of NCP' | शिवसेना प्रवेशाचे वृत्त तटकरेंनी नाकारले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार'
शिवसेना प्रवेशाचे वृत्त तटकरेंनी नाकारले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार'

अलिबाग : शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी नाकारले असून खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी तटकरे यांची भेट झाली असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास तो अजितदादांना मोठा धक्का असू शकतो. ते शिवसेनेत आल्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम होईल, असे तर्क त्यासाठी लावले जात होते. मात्र या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.
पक्ष सोडायचाच असता, तर तटकरे यांनी तो लोकसभा निवडणुकीआधीच सोडला असता, असे पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केले.
काहीच दिवसांपूर्वी तटकरे हे भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर काही कामानिमित्त गेले होते. मात्र तेथे राष्ट्रवादी काँग्रेससह, काँग्रेसमधील काही नेत्यांची भाजपा प्रवेशाची बैठक सुरु असल्याचे कळताच त्यांनी तेथून काढता पाय घेतला होता. तेव्हाही त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या बातम्या पसरल्या
होत्या.

Web Title: Tatkare denies news of Shiv Sena joining, 'I am MP of NCP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.