वादळात नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने टपरीधारकांत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 01:16 AM2021-03-07T01:16:04+5:302021-03-07T01:16:18+5:30

सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना भेटणार : तोडगा न निघाल्यास आंदोलन

Tapari holders angry over lack of help despite storm damage | वादळात नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने टपरीधारकांत नाराजी

वादळात नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने टपरीधारकांत नाराजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुरुड : ३ जूनला झालेल्या चक्रीवादळात  समुद्रकिनारी असणाऱ्या ६० टपरीधारकांचे अतोनात नुकसान होऊनसुद्धा शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न मिळाल्यामुळे सर्व गरीब टपरीधारक चिंतेत व कर्जबाजारी झाले आहेत. समुद्रकिनारी असणाऱ्या टपरीधारकांना मदत मिळावी यासाठी पदमदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर  यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या वेळी उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांच्या मध्यस्थीने मुरुड नगर परिषदेकडून वार्षिक भाड्यात सूट देण्याचे वचन देण्यात आले होते. या सभेत मुरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडितसुद्धा उपस्थित होते. आश्वासन देऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटूनसुद्धा अद्यापपर्यंत मुरूड नगर परिषदेकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील टपरीधारक चिंताग्रस्त झाले आहेत. 

आमच्या टपऱ्या या कायमस्वरूपी नसून फक्त आम्ही व्यवसाय करीत आहोत. आमचे कोणतेही पक्के बांधकाम नाही. हातगाडीवर चालणारा आमचा व्यवसाय असताना आम्ही सीआरझेडमध्ये आहोत म्हणून मदत न मिळणे हे योग्य नसल्याचे मत या वेळी गायकर यांनी व्यक्त केले होते. सीआरझेड पक्के बांधकाम व घर असेल तरच लागू होणार आहे. हातगाडीवर धंदा करणाऱ्यांना कसला सीआरझेड कायदा लावता, असा प्रश्नसुद्धा अरविंद  गायकर यांनी प्रशासनाला विचारला होता. परंतु मदत देता येणार नाही या गोष्टीवर प्रशासन ठाम राहिल्याने अखेरच्या क्षणी मुरुड नगर परिषदेकडून वार्षिक भाड्यात सूट देण्याचे ठरवण्यात आले होते. मुख्याधिकारी अमित पंडित यांनी सभागृहाला विचारून वार्षिक भाडेमाफीचा  निर्णय घेणार असल्याचे या वेळी सांगितले होते. परंतु आज दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी जाऊनसुद्धा भाडेमाफी झाली नसल्याने सर्वजण चिंताग्रस्त आहेत.
याबाबत गायकर यांनी, मुरुड नगर परिषद एक वर्षाचे आठ हजार रुपये भाडेमाफी देणार होती. परंतु त्यांनी अद्यापपर्यंत मला कोणतेही उत्तर दिलेले नाही. सोमवारी सर्व टपरीधारकांसमवेत मुख्याधिकारी यांची भेट घेणार आहोत. जर तोडगा निघाला नाही तर पुन्हा मी माझे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. 

Web Title: Tapari holders angry over lack of help despite storm damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड