Talai Landslide: तळीये गावात कसे झाले अंत्यविधी?; सरपंचांचे शब्द ऐकून डोळे पाणावतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:35 PM2021-07-24T18:35:15+5:302021-07-24T19:03:47+5:30

Talai Landslide: आतापर्यंत ३३ जणांचे मृतदेह हाती; एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू

Talai Landslide villagers could not arrange material to perform final rites due to heavy rain | Talai Landslide: तळीये गावात कसे झाले अंत्यविधी?; सरपंचांचे शब्द ऐकून डोळे पाणावतील

Talai Landslide: तळीये गावात कसे झाले अंत्यविधी?; सरपंचांचे शब्द ऐकून डोळे पाणावतील

googlenewsNext

रायगड: मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत ४० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मदतकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाची पाहणी केली. त्यांनी ग्रामस्थांना धीर दिला. सरकारकडून संपूर्ण मदत दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र तळीये गावातलं चित्र मन विषण्ण करणारं आहे.

तळीये गावात दरडीच्या रुपात अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. तळीये गावात आता केवळ विध्वंसाच्या खुणा दिसत आहेत. आतापर्यंत ३३ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र त्यांच्यावर नीट अंत्यसंस्कारदेखील करता आलेले नाहीत, अशा शब्दांत  सरपंच संपत तानलेकर यांनी ग्रामस्थांची व्यथा मांडली.

दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांना जेसीबीच्या माध्यमातून पुरण्यात आलं. 'आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांना एकत्रित खड्ड्यात पुरण्यात आलं. मुसळधार पावसामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी सामानाची व्यवस्था करणंदेखील आम्हाला जमलं नाही,' असं सरपंचांनी सांगितलं. पावसानं रौद्र रुप धारण केल्यानं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. अनेकांचा बळी गेला. त्याच मुसळधार पावसामुळे मृत ग्रामस्थांवर अंत्यसंस्कार करणंदेखील शक्य झालं नाही.

मुख्यमंत्र्यांसमोर महाडवासीयांनी टाहो फोडला, माय-बाप सरकारने धीर दिला

तळीये गावात नेमकं काय घडलं?
तळीये गावातील दुर्घटनेत बचावलेल्या एका वृद्ध आजोबांनी ही दुर्घटना घडली तेव्हाचा भयाण अनुभव कथन केला आहे. डोंगराला भेग जाऊन दरड कोसळतेय हे दिसताच गावकरी घरे सोडून निघून जाण्यासाठी एकत्र आले असतानाच अचानक मातीचा ढिगारा खाली आला आणि यामध्ये सगळे गाडले, गेले अशी माहिती या आजोबांनी दिली.

दुर्घटनेत बालंबाल बचावलेल्या बबन सकपाळ नावाच्या आजोबांनी सांगितले की, संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास दुर्घटना घडली. वर दरड कोसळतेय म्हणून आरडाओरडा झाला तेव्हा आम्ही घरातून बाहेर पडलो. मात्र आम्ही घरातून बाहेर पडत असतानाच वरून मातीचा ढिगारा आला आणि आजूबाजूची घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. काहीच शिल्लक राहिलं नाही. आमच्या नव्या घराच्या मागे असलेलं आमचं जुनं घरही या दुर्घटनेत भुईसपाट झालं.

डोंगराला भेग जाऊन दरड कोसळणार असे वाटू लागल्याने गावातील लोक सावध झाले होते. सगळे एकत्र येऊन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी धावपळ करत होते. मात्र त्याचवेळी अचानक वरून दरडीची चिखल माती आली आणि सगळे गाडले गेले. सुदैवाने आम्ही लोकं जमले होते त्या दिशेला न जाता दुसऱ्या वाटेला गेलो त्यामुळे आम्ही बचावलो. पण तिथे जमलेले सगळे गाडले गेले. कुणीच जिवंत राहिला नाही, असे या आजोबांनी सांगितले.

आमच्या घरात आम्ही तीन माणसं राहतो. आम्ही तिघेही बचावलो. मात्र घरावर दगड माती येऊन पडली आहे. घरात काहीच शिल्लक राहिलेलं नाही. घरातलं धान्य भिजून गेलं आहे. राहायला जागा नाही. आता मी कुटुंबाला घेऊन चार गुरांना घेऊन रानात राहतोय. खाण्यापिण्याची काही व्यवस्था नाही आहे, अशी व्यथा या ज्येष्ठ नागरिकांनी मांडली.  

 

Web Title: Talai Landslide villagers could not arrange material to perform final rites due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.