आरसीएफ थळच्या रेल्वे मार्गावर अलिबाग पॅसेंजर सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 11:03 PM2019-09-09T23:03:09+5:302019-09-09T23:03:29+5:30

प्रवीण ठाकूर यांची मागणी : खड्ड्यांच्या जंजाळामधून जनतेची सुटका करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र

Start Alibaug Passenger on the RCF Toll Railway! | आरसीएफ थळच्या रेल्वे मार्गावर अलिबाग पॅसेंजर सुरू करा!

आरसीएफ थळच्या रेल्वे मार्गावर अलिबाग पॅसेंजर सुरू करा!

googlenewsNext

अलिबाग : काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष व रायगड बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी आरसीएफ थळच्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावर अलिबाग पॅसेंजर (प्रवासी वाहतूक) सुरू करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली असल्याने या मागणीची दखल केंद्र व राज्य शासन कशी घेतात याकडे रायगडवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनच दिवसांपूर्वीच्या त्यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये देशात पायाभूत सुविधांसाठी पाच वर्षांत १०० लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला देण्याचीही ग्वाही दिली आहे. अलिबागचा समावेश मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामध्ये करण्यात आलेला असल्याने अलिबागसाठी प्रवासी रेल्वे सुरू करण्यासाठी शासनामार्फत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी अ‍ॅड.प्रवीण ठाकूर यांनी केली आहे. पेण- अलिबाग रेल्वे सुरू करण्याबाबत गेल्या पाच वर्षात अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या, परंतु प्रत्यक्षात काहीच कार्यवाही होत नसल्याने ठाकूर यांनी खंत व्यक्त केली आहे.

रायगड जिल्ह्याचे अलिबाग हे मुख्यालय असून १९८५ पासून अलिबागपासून ८ कि.मी. अंतरावर रेल्वेमार्ग चालू झालेला आहे, परंतु आजतागायत तेथून केवळ माल वाहतूक तीही आर.सी.एफ. कंपनीकरिता होत आहे. मात्र आजतागायत तेथे प्रवासी वाहतूक सुविधा झालेली नाही. गेली ३० वर्षे सर्वसामान्य माणूस या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होईल याची आतुरतेने वाट पहात आहे. प्रवीण ठाकूर यांनीही याबाबत २०१४ पासून वारंवार मंत्र्यांना पत्र पाठवून विनंत्या केल्या आहेत. रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करीत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.

रेल्वे सुरू झाल्यास होणारे फायदे
अलिबाग पॅसेंजर रेल (प्रवासी वाहतूक) सुरू झाल्यास अलिबागजवळील चोंढी या ठिकाणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने प्लॅटफॉर्म, स्टेशन करणे सहज शक्य आहे, तसे झाल्यास सर्वसामान्य माणसाला कमी खर्चात, कमी वेळेत मुंबईत जाणे सोपे होईल. अलिबागलगतचा भाग पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटकांना देखील रेल्वे वाहतुकीमुळे फायदा होईल. रस्ते वाहतुकीचा प्रश्न (ट्रॅफिक) कमी होईल व बाराही महिने प्रवाशांना व्यवस्थित प्रवास करता येईल. अलिबाग मुंबईपासून रस्त्याने ११० कि.मी. तर समुद्रामार्गे २ तासांच्या अंतरावर आहे. पेण येथे रेल्वे स्टेशन आहे, तेथून रेल्वेने २० मिनिटांत अलिबागला येता येईल. पोयनाड, कामार्ले, चोंढी असे स्टॉप करता येतील. सदर प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू झाली तर व्यापारी, शेतकरी, नोकरदार, विद्यार्थ्यांना देखील फार फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Start Alibaug Passenger on the RCF Toll Railway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे