अवधूत तटकरेंच्या प्रवेशावरून शिवसेना पक्षात सोशल वॉर; नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 11:15 PM2019-09-10T23:15:19+5:302019-09-10T23:15:36+5:30

रोहा तालुक्यात निरुत्साह आणि संभ्रमावस्था

Social war in the Shiv Sena party at the entrance of the underground coast; Annoyance tone | अवधूत तटकरेंच्या प्रवेशावरून शिवसेना पक्षात सोशल वॉर; नाराजीचा सूर

अवधूत तटकरेंच्या प्रवेशावरून शिवसेना पक्षात सोशल वॉर; नाराजीचा सूर

googlenewsNext

मिलिंद अष्टिवकर 

रोहा : खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तटकरे कुटुंबातील वाद म्हणजे ठरवून केलेल्या उत्कृष्ट राजकारणाचा नमुना असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परिणामी रोहा तालुक्यात कुठेही उत्साहाचे वातावरण जाणवत नसून या पक्षांतराने जनतेत मात्र संभ्रमावस्था आहे. या प्रवेशानंतर काही शिवसैनिकांकडून सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्यानंतर स्थानिक सेना नेत्यांनी सावध पवित्रा घेत कार्यकर्त्यांना तंबी दिल्याचे दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे पेव फुटले आहे. काही केल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील गळती थांबण्यास तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी आधीच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. तर आता आमदार अवधूत तटकरे, वडील माजी आमदार अनिल तटकरे व भाऊ संदीप तटकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला आहे. रायगडमध्येही राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असल्याचे चित्र असले तरी रायगडमध्ये तटकरे कुटुंबीयांतील वाद म्हणजे ठरवून केलेले उत्कृष्ट राजकारण असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आले. पेण विधानसभा निवडणुकीत तटकरे कुटुंबात असेच कलह झाले. सुनील तटकरे यांचे थोरले बंधू अनिल तटकरे यांनी काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षाची आघाडी असतानाही पेणमधून आघाडीच्या विरोधात उमेदवारी केली. या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसून आघाडीचे उमेदवार माजीमंत्री रवींद्र पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी कौटुंबिक वाद असल्याचे चित्र निर्माण करून तटकरेंनी दगा केल्याचा जाहीर आरोप रवी पाटील यांनी केला होता.

रोहा नगरपरिषदेच्या २०१६ मधील निवडणुकीत विरोधातील मतांची विभागणी होणे तटकरेंसाठी आवश्यक होते. तेव्हा ही तटकरे कुटुंबात असेच वाद झाले. सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश करीत सेना पुरस्कृत उमेदवारी केली. तर आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवित शुभारंभ केला होता. या निवडणुकीत मतविभागणीचा फटका बसून नगराध्यक्ष पदासाठी विरोधात असलेले अपक्ष उमेदवार समीर शेडगे यांचा केवळ सहा मतांनी पराभव झाला. तटकरेंनी केलेले तात्पुरत्या स्वरूपाचे पक्षांतर यशस्वी होत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सहा मतांच्या फरकाने निवडून आले.

या निवडणुकीनंतर संदीप तटकरे पुन्हा स्वगृही परतले तर डिसेंबर २०१६ मध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करणारे आमदार अवधूत तटकरे एप्रिल २०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या अदिती तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वात पुढे होते. परिणामी तटकरे कुटुंबीयांतील हा तथाकथित कलह आणि बेबनाव जनतेपासून लपून राहिलेला नाही.

शिवसेनेचे तालुका प्रमुख समीर शेडगे हे रोहा तालुक्यात खा. सुनील तटकरे यांचे कडवे विरोधक बनले आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रोहा शहरातील बहुतांशी प्रभागात सुनील तटकरेंना सेनेच्या उमेदवारापेक्षा कमी मतदान झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अवधूत तटकरे यांना सेनेत पाठवून तालुक्यात कडवे बनत चाललेल्या विरोधकांच्या तटकरेंनी विकेट घेतल्याचे बोलले जात आहे.

तटकरे कुटुंबीयांतील वाद म्हणजे मॅच फिक्सिंग असते, नाटक कंपनीप्रमाणे तटकरे कुटुंबीय निवडणुका आल्या की कुटुंबात कलह असल्याचे मतदारांना भासवतात, पुन्हा हे वाद आपसुक मिटतात आणि परिस्थितीनुरूप तटकरे हवे तसे राजकारण करतात.
- उस्मान रोहेकर, रोहा तालुका शिवसेना अल्पसंख्याक विभाग प्रमुख

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार अवधूत तटकरे व त्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला आहे. पक्षप्रमुखांचा हा निर्णय म्हणजे आमच्यासाठी आदेश आहे. आम्ही सर्वांनी त्याचे आदरपूर्वक स्वागत केले आहे. कोणत्याही प्रवेश केलेल्या नेत्यावर टीका टिपणी करून संघटनेमध्ये अस्थिरता माजवण्याचे कृत्य सहन केले जाणार नाहीत. - समीर शेडगे, शिवसेना रोहा तालुका प्रमुख

पक्षाला किती फायदा?
अवधूत तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघात आमदारकीच्या काळात आपला प्रभाव टाकता आला नाही. यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्याने त्याचा फायदा पक्षाला किती होणार हा प्रश्नच आहे.

Web Title: Social war in the Shiv Sena party at the entrance of the underground coast; Annoyance tone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.