निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:34 PM2020-02-12T23:34:07+5:302020-02-12T23:34:11+5:30

जयंत पाटील यांचा घणाघाती हल्ला : झिराड ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे नूतनीकरण

Shakap defeated by leading in election | निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव

निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : विधानसभा निवडणुकीत आघाडीमुळे शेकापचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणेच दगा फटका केल्याचा घणाघाती हल्ला शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार पाटील यांनी प्रथमच जाहीर सभेत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. आमदार पाटील यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांच्या असलेल्या मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
झिराड ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याचे नूतनीकरण, पाझर तलावाच्या भूमिपूजनासाठी आमदार जयंत पाटील उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून पुन्हा एकदा ग्रामपंचायतींचा विकास करण्यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी नेहमीच आग्रही आहोत. मात्र, आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय दुसरे कोणी तरी लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला नाव न घेता शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना आमदार पाटील यांनी लगावला. आमच्या कालावधीतील एखाद्या विकासकामासाठी निधी मंजूर होऊन त्याची वर्कआॅर्डर आता निघाली असेल तर त्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. मात्र, नागरिकांना विकासकामे कोणी मंजूर करून आणली आणि आतापर्यंत शेकापनेच विकास केला असल्याचे माहीत आहे. त्यामुळे कोणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मागील निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा एकही मतदार कमी झाला नाही. उलट ग्रामपंचायतीच्या विभागात मतदारांची वाढ झाली आहे. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी असताना काँग्रेसने उमेदवार उभा करूनही त्यांना आपली मत मिळविता आली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे दगा फटका केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत मते आघाडीचे उमेदवार सुभाष उर्फ पंडित पाटील यांना मिळाली असती तर नक्कीच विजय झाला असता, अशी खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
सध्याचे सरकार हे किती दिवस टिकेल याचा काही नेम नाही. काही दिवसांतच पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार पडले आणि पुन्हा निवडणुका झाल्यास आम्हाला एक संधी मिळून पुन्हा शेकापचा उमेदवार आमदार झालेला पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार सुभाष पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मंत्रिपद न मिळाल्याने शेकापची नाराजी?
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना मंत्रिमंडळामध्ये आ.जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील एखादे मंत्रिपद दिले जाईल, अशी भाबडी आशा शेकापला होती. खा.सुनील तटकरे यांना २०१९ च्या लोकसभेत निवडून आणण्यात शेकापची महत्त्वाची भूमिका होती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेमध्ये फक्त १२ सदस्य निवडून आलेले असताना शेकापचे जयंत पाटील यांनी तटकरे यांची मुलगी सध्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना त्या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान केले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुका या आघाडीच्या माध्यमातून लढण्यात आल्या होत्या. त्याचा कमी-अधिक फायदा आघाडीला झाला. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यासाठी स्वत:
खा. तटकरे यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, अशी भाबडी आशा शेकापला असल्याचे बोलले जाते.

Web Title: Shakap defeated by leading in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.