आधार कार्डसाठी नागरिकांच्या रांगा कायम; शासनाच्या डिजिटल सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 11:41 PM2020-10-16T23:41:20+5:302020-10-16T23:41:40+5:30

ग्रामीण भागातील ई-सेवा केंद्र, संग्राम केंद्र बंदच

Queues of citizens for Aadhar card maintained; Disruption of government digital services | आधार कार्डसाठी नागरिकांच्या रांगा कायम; शासनाच्या डिजिटल सेवेचा बोजवारा

आधार कार्डसाठी नागरिकांच्या रांगा कायम; शासनाच्या डिजिटल सेवेचा बोजवारा

Next

दासगाव : विविध दाखले आणि शासकीय लाभासाठी लागणाऱ्या आधार कार्डसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र कुचकामी ठरले तर मुबलक आधार केंद्रांमुळे नागरिकांना रांगाच रांगा लावाव्या लागत आहेत. आधार कार्ड लवकर मिळावे म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना पहाटेच शहरात येऊन आधारसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.

विविध शासकीय दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड गरजेचे आहे. नागरिक ओळखपत्र म्हणून आधार कार्ड महत्त्वपूर्ण असल्याने गेल्या काही वर्षांपासून आधार कार्ड काढणे बंधनकारक झाले आहे. सुरुवातीस नागरिकांनी काढलेल्या आधार कार्डमध्ये अनेक चुका झाल्या आहेत. यामध्ये स्पेलिंग दुरुस्ती, जन्मतारीख बदल, सदोष छायाचित्रामुळे अनेक नागरिकांना शासकीय दाखले मिळण्यात आणि शासकीय योजनांचा लाभ घेताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अशा दुरुस्तीसाठी आता गर्दी वाढू लागली आहे. त्यातच प्रत्येक विद्यार्थी, बालक यांनादेखील शालेय पोषण आहार, शिष्यवृत्तीकरिता आधार महत्त्वाचे आहे. विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनादेखील आधारसाठी धावपळ करावी लागत आहे.

महाड तालुक्यात केंद्र शासनाच्या भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने महाडमध्ये बँक ऑफ इंडिया, महाड पोस्ट कार्यालय, महाड नगरपालिका आणि अन्य एक खाजगी अशी फक्त चार केंद्रे अस्तित्वात आहेत. यातील पोस्ट कार्यालयात ठरावीक दिवशीच आधारबाबत काम केले जाते. बँक ऑफ इंडिया या ठिकाणीदेखील अर्ज मिळत नसल्याने नागरिकांना धावपळ करावी लागते. यामुळे महाड नगरपालिकेच्या आधार केंद्रावर नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातून नागरिक आधारसाठी येत असल्याने अनेकांना वेळ आणि इंटरनेटच्या खंडित सुविधेमुळे अनेक वेळा परत जावे लागते. तर अनेकांना परत जावे लागू नये म्हणून पहाटे चार वाजता रांगेत उभे राहावे लागत आहे. 

महाड तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महाऑनलाइन विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई सेवा केंद्रांची संख्या जवळपास ६० आहे. मात्र, ई सेवा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणा केला तरी प्रशासकीय पातळीवर कामे होत नसल्याचे समोर आल्याने अनेक जण एजंटचा आधार घेतात. महाड तालुक्यात केंद्र शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेटने जोडण्यासाठी दूरसंचार विभागाकडून जोडणी करण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात दूरध्वनी सेवा ठप्प आहे तर अनेक गावांत आजही मोबाइल सेवा मिळत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयात बसविण्यात आलेली इंटरनेट यंत्रणा धूळखात पडून आहे. यामुळे या ठिकाणी सुरू करण्यात आलेले संग्राम केंद्रदेखील ठप्प आहे. ग्रामीण भागात आधारसह अन्य दाखले गावातच मिळावेत म्हणून संग्राम केंद्र आणि ई सेवा केंद्र सुरू झाले खरे मात्र हा उद्देश अद्याप साध्य झालेला नाही.

Web Title: Queues of citizens for Aadhar card maintained; Disruption of government digital services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.