कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने; रायगड, नवी मुंबईत आंदोलने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 12:24 AM2020-08-10T00:24:46+5:302020-08-10T00:24:53+5:30

कर्नाटक येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. रायगड जिल्ह्यातही शिवसेनेने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला.

Protests against the Karnataka government; Agitations in Raigad, Navi Mumbai | कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने; रायगड, नवी मुंबईत आंदोलने

कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने; रायगड, नवी मुंबईत आंदोलने

googlenewsNext

कर्नाटक येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आल्याने याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. रायगड जिल्ह्यातही शिवसेनेने ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.ए.येडियुरप्पा यांच्या निषेधार्थ घोषणा देत, कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुन्हा पुतळ्याची त्याच ठिकाणी स्थापना करण्याची मागणी करण्यात आली, तर नवी मुंबई शहरातही काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध क रण्यात आला.

अलिबागमध्ये शिवसेनेतर्फे निषेध आंदोलन; जोरदार घोषणाबाजी
अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ रविवारी अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे शहरात कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कर्नाटकमधील बेळगाव येथील एका ग्रामपंचायतीने बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने तातडीने हटविला. कर्नाटक सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी अलिबाग तालुका शिवसेनेने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर रविवारी दुपारी बारा वाजता निषेधार्थ निदर्शने केली. कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हटवून महाराजांचा अपमान केला आहे. पक्षाचा आदेश आल्यास अलिबाग तालुक्यातील शिवसैनिक कर्नाटक येथे जाऊन आंदोलन करतील.

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने त्या जागी पुन्हा बसवावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी यावेळी केली. उपस्थित शिवसैनिकांनी यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त
कर्नाटक सरकारने देशाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून पाप केले आहे. त्याचा अलिबाग तालुका शिवसेना जाहीर निषेध करीत आहे. पक्षाचा आदेश आल्यास अलिबाग तालुक्यातील शिवसैनिक कर्नाटकात जातील, असा इशारा तालुकाप्रमुख राजा केणी यांनी यावेळी दिला. आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

प्रतीकात्मक पुतळ्याला मारले जोेडे
उरण : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील माणगुती गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कर्नाटक सरकारने रातोरात हटविल्याने, संतप्त झालेल्या उरण शिवसेनेच्या वतीने रविवारी (९) कर्नाटक सरकारच्या प्रतिकृती असलेल्या पुतळ्याला जोडे मारून जाहीर निषेध केला.

शिवसेना उरण शहर शाखेजवळ उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या निषेध कार्यक्रमात सहभागी झालेल्या शिवसैनिकांनी भाजपच्या कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. निवडणुकीत मते मागण्यासाठी व सरकार स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा व नंतर त्यांचा अपमान करायचा, या भाजप नीतीचा उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी जाहीरपणे निषेध केला. यावेळी शिवसैनिक सोशल डिस्टन्सचे पालन करीत सहभागी झाले होते.

मुरुडमध्ये शिवभक्तांनी पुतळा जाळून केला निषेध
आगरदांडा : कर्नाटक येथील मनगुत्ती गावात नागरिकांनी बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटविण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळल्याने, रविवारी सकाळी मुरुड तालुक्यातील शिवसेना कार्यकत्यांनी मुरुड बाजारपेठ नाक्यावर येऊन कर्नाटक सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘कर्नाटक भाजप सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ, शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, शहरप्रमुख आशील ठाकूर, उपशहर प्रमुख विजय वाणी, नगरसेवक प्रमोद भायदे, नगरसेवक पाडुरंग आरेकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Protests against the Karnataka government; Agitations in Raigad, Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.