भाजीपाला-डाळींचे दर उसळले, किचन बजेट पडले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 12:37 AM2020-10-10T00:37:28+5:302020-10-10T00:37:54+5:30

गृहिणींना आर्थिक फटका; डाळी-पालेभाज्या पोहोचल्या शंभरी पार

Prices of vegetables and pulses skyrocketed, kitchen budgets fell | भाजीपाला-डाळींचे दर उसळले, किचन बजेट पडले

भाजीपाला-डाळींचे दर उसळले, किचन बजेट पडले

Next

- निखिल म्हात्रे

अलिबाग : अनलॉकनंतर सर्वच व्यवहार आता पूर्वपदावर येत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पालेभाज्या आणि डाळींच्या दराने चांगलीच उसळी घेतली आहे. त्यामुळे गृहिणींचे ‘किचन बजेट’ कोलमडून पडले आहे.

सध्या भाजीपाल्याची आवक कमी मात्र, मागणी जास्त असल्याने त्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबर हे तीन महिने उपवासाचे असल्याने नागरिकांचा ओढा शाकाहाराकडे अधिक आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि डाळींना मागणी अधिक आहे. त्यामुळे किमतीत वाढ झाली असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात अनलॉक-५ची सुरुवात झाली आहे. अद्याप वाहतूक सेवा सुरळीत झाली नसल्याने भाजीपाल्याच्या गाड्या दररोज येत नाहीत. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त, अशी अवस्था सध्या बाजारपेठांमध्ये झाली आहे. अचानक वाढलेल्या भाजीपाल्याच्या किमतींमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. साधी कोथिंबिरीची जुडी घेताना महिला विचार करत आहेत. लसूण-मिरचीच्या किमती वाढल्याने, वरणाच्या फोडणीचा चांगलाच ठसका महिला वर्गाला लागत आहे. दुसरीकडे कांदाही सर्वांनाच रडवत आहे.

कोरोनाच्या काळात टाळेबंदी झाल्याने अचानक सर्वच गोष्टींचा भाव वाढला. त्यामध्ये भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तरीही दैनंदिन जीवनाची भाजीपाला ही गरज असल्याने खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- आनंद पवार, ग्राहक

कोरोनाच्या कालावधीत शेतकरी शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेण्यास घाबरत होते. लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधने आली होती. त्यातच भाजीपाल्याला अचानक मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या आहेत.
-हर्ष ढवळे, भाजी विक्रेते

कोरोना कालवधीत धोका पत्करून कुटुंबाचा भार पेलविण्यासाठी शेतीकडे वळलो. शेतात पिकविलेल्या भाजीपाल्यातून उत्पादन मिळाले. मात्र, उत्पादन घेण्यासाठी बी-बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे.
-प्रवीण लोंढे, भाजीपाला उत्पादक शेतकरी

भाजीपाला-डाळी महागण्याची कारणे
मागील तीन महिने शाकाहाराचे असल्याने, भाजीपाल्यासह डाळींना अधिक मागणी आहे. टाळेबंदी काळात वाहतूक सेवा काही काळ बंद होती. वेळेमध्ये वस्तुंचा पुरवठा होत नसल्याने किमती वाढल्या आहेत.

Web Title: Prices of vegetables and pulses skyrocketed, kitchen budgets fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.