Political leaders came to power after the polling in Raigad | रायगडमध्ये मतदानानंतर राजकीय चर्चांना आले उधाण
रायगडमध्ये मतदानानंतर राजकीय चर्चांना आले उधाण

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २३ एप्रिल रोजी निवडणूक पार पडली. ६१.७७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत झाल्याने कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत सर्वत्रच उत्सुकता लागली आहे. चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये तटकरे आणि गीतेंच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू असल्याचे दिसून येते. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने पुढचा एक महिना अशाच राजकीय चर्चांना चांगलेच उधाण येणार आहे.

गेले महिनाभर निवडणूक प्रचाराचा धुरळा शहरी भागापासून ग्रामीण भागामध्ये चांगलाच अनुभवायला मिळाला होता. निवडणुका मंगळवारी पार पडल्यानंतर राजकीय वातावरण शांत होईल असे वाटत होते. मात्र, आता कोणता उमेदवार निवडून येणार या विषयावरच चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहेत. चर्चा करणाऱ्यांनी कोणाच्या बाजूने निकाल लागणार हेही जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीमधील नेत्यांची, उमेदवारांची चांगलीच धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.

आघाडीमध्ये शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापची ताकद आहे. तटकरे यांची मदार खºया अर्थाने अलिबाग विधानसभा मतदारसंघावरच आहे. याच मतदारसंघातून त्यांना मताधिक्क मिळेल, असा आघाडीतील प्रमुखांचा अंदाज आहे. या विभागात ते जास्तीत जास्त मताधिक्य घेतील त्यावरच त्यांच्या विजयाचे समीकरण सुटणार आहे. गीते यांना या मतदारसंघात फारसे यश मिळेल असे दिसून येत नसले तरी, शेकाप आणि काँग्रेस एकत्र आल्याचा विपरीत परिणाम आघाडीवर होऊन त्याचा फायदा गीतेंना मिळेल असाही एक मतप्रवाह आहे.

पेण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकाप भक्कम आहे. मात्र, माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. येथे ही शेकाप-काँग्रेस एकत्र आल्याचा बरा-वाईट परिणाम होणार आहे. या मतदारसंघातील चर्चांत शहरी भागासह ग्रामीण भागात गीतेंना सरस ठरवण्यात आले आहे.

महाड विधानसभा मतदारसंघात तर याहीपेक्षा मोठमोठ्या चर्चा ऐकाला मिळत आहेत. आमदार भरत गोगावले हे एकटे आघाडीवर भारी पडणार आहेत. येथून गीतेंना मताधिक्क मिळेल अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे गीतेंसाठी ही जमेची बाजू ठरणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांच्या काँग्रेसने किती काम केले आहे ते मतपेटी उघडल्यावरच समोर येईल, अशीही चर्चा काँग्रेसच्या बाजून होताना दिसते.

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात तटकरे यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत, त्यामुळे तटकरे यांना या विभागातून मताधिक्क मिळेल अशी चर्चा होत आहे. येथील शिवसेनेच्या गोटातून तटकरे यांच्यावर धनुष्यबाण भारी पडेल, असेही बोलले जात आहे.
दापोली आणि गुहागर मतदारसंघामध्ये कुणबी, मराठा मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी हा फॅक्टर दापोलीमध्ये गीतेंच्या बाजूने तर गुहागरमध्ये तटकरेंच्या बाजूने उभा राहणार असल्याची धडाकेबाज चर्चा आहे.

दरम्यान, मतदारांनी कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले आहे हे २३ मे रोजी होणाºया मतमोजणीनंतरच खºया अर्थाने स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळेल. तोपर्यंत रोज नवीन राजकीय चर्चा ऐकायला मिळणार आहेत एवढे मात्र निश्चित आहे.


Web Title: Political leaders came to power after the polling in Raigad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.