दुर्गम भागात ऑफलाइन शिक्षण, अलिबागमधील शिक्षकांची अनोखी संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 02:55 AM2020-08-04T02:55:33+5:302020-08-04T02:56:17+5:30

अभ्यासमालेची केली निर्मिती : अलिबागमधील शिक्षकांची अनोखी संकल्पना

Offline education in remote areas, a unique concept for teachers in Alibag | दुर्गम भागात ऑफलाइन शिक्षण, अलिबागमधील शिक्षकांची अनोखी संकल्पना

दुर्गम भागात ऑफलाइन शिक्षण, अलिबागमधील शिक्षकांची अनोखी संकल्पना

Next

आविष्कार देसाई

रायगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वांनाच आॅनलाइन शिक्षण घेता येत नाहीत. यावर अलिबागमधीलशिक्षकांनी एकत्र येत, आॅफलाइन अभ्यासमालेची निर्मिती केली आहे. त्यांच्या या भन्नाट संकल्पनेमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे राज्यातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, अनेक पालकांकडे अँड्रॉईड मोबाइलच नसल्याने, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येत आॅफलाइन अभ्यासमालेची निर्मिती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनाही या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन पीएनपी शिक्षण संस्थेच्या कार्यवाह तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते रविवारी झूम मीटिंगच्या माध्यमातून करण्यात आले. याप्रसंगी अलिबाग टीचर्स ब्लॉगचेही उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्रात आॅनलाइन शिक्षण सुरू असताना, अलिबाग तालुक्याने आॅफलाइन शिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांनी आॅफलाइन अभ्यासमाला तयार केली आहे. अभ्यासमालेच्या इयत्तानिहाय पीडीएफ तयार करण्यात आल्या आहेत. त्या पीडीएफच्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, असे शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांनी सांगितले, अभ्यासमाला तयार करण्याकरिता सुबोध पाटील, रवींद्र थळे यांच्या नियोजन महत्त्वाचे ठरले. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष नरेंद्र गुरव, उज्ज्वला पाटील यांच्या प्रेरणेने ही अभ्यासमाला तयार करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, उपाध्यक्ष नरेंद्र गुरव, उज्ज्वला पाटील, सुबोध पाटील, रवींद्र थळे, अजित हरवडे, सतीश भगत, स्वाती म्हात्रे व तालुक्याध्यक्ष प्रमोद भोपी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक शिक्षकांना येणाऱ्या विविध समस्यांची चित्रलेखा पाटील यांनी झूम मीटिंगद्वारे शिक्षकांशी चर्चा केली.

तळागाळातील आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार शिक्षण
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उपशाखा अलिबाग तथा प्राथमिक शिक्षक मंच अलिबागच्या वतीने ही अभ्यासमाला साकारण्यात आली आहे. ८० टक्के पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसल्यामुळे या कुटुंबातील हजारो मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, या अभ्यासमालेच्या माध्यमातून तळागाळातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेता येणार आहे.

८० टक्के पालकांकडे फोन नाही

च्शाळा बंद, पण शिक्षण सुरू या भूमिकेतून जात असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलिबाग तालुक्यामध्ये आदिवासी समाज आहे. सरकारने आॅनलाइन शिक्षण सुरू केले असले, तरी अद्यापही ८० टक्के पालकांकडे अँड्रॉइड फोन नाहीत, इंटरनेटची समस्या आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

च्अशा परिस्थितीत तळागाळातील विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे घ्यावे? असा प्रश्न शिक्षण व्यवस्थेला पडणे स्वाभाविकच आहे. प्रत्येकांना शिक्षण मिळालेच पाहिजे, या धोरणाला धरून अलिबाग तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन सर्व विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण देण्याचे ठरविले आहे.

अलिबाग तालुक्यातील शिक्षकांनी निर्मिती केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. भविष्यातील विद्यार्थी सर्व आव्हानांना सामोरा जाणारा असावा, त्या दृष्टीने हा उपक्रम उपयोगी पडेल. जिल्हा परिषदेतील शाळांचा पट वाढविणारे विविध उपक्रम शिक्षकांनी करणे गरजेचे आहे. त्या सर्व उपक्रमांना माझे सहकार्य राहील.
- चित्रलेखा पाटील, पीएनपी, कार्यवाह
 

Web Title: Offline education in remote areas, a unique concept for teachers in Alibag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.