मुरूड बाजारपेठ आजपासून चार दिवसांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 12:18 AM2020-06-01T00:18:54+5:302020-06-01T00:19:09+5:30

सर्वपक्षीय सभेत निर्णय : कोरोनाला रोखण्यासाठी चर्चा

Murud market closed for four days from today | मुरूड बाजारपेठ आजपासून चार दिवसांसाठी बंद

मुरूड बाजारपेठ आजपासून चार दिवसांसाठी बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : मुरूड शहरातील मसालगल्ली परिसरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने हा परिसर मुरूड पोलिसांनी सील केला आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. ही घटना मुरूड शहरात घडल्याने यावर प्रतिबंधात्मक उपाय आखण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय सभा पाटील खानावळ येथे आयोजित करण्यात आली होती.
या सभेत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाजारपेठ चार दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे निर्मल स्वछ अभियानांतर्गत मुरूड नगर परिषदेस कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. हे पैसे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खर्च करण्याची अनुमती मिळवण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे विशेष पत्रव्यहार करून ही सहमती मिळवून हे काम मार्गी लावण्याची सूचना केली.
नगरसेवक मनोज भगत यांनी प्रत्येक नगरसेवकाने वॉर्डप्रमाणे समिती स्थापन करून नवीन येणाऱ्यांची नोंद ठेवण्यात यावी व पुन्हा एकदा मुरूड शहर सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात यावे, अशी सूचना केली. अरविंद गायकर यांनी मुरूड नगर परिषदेच्या सफाई कामगारांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांना पीपीई किट प्रदान करण्यात यावे, अशी सूचना केली.
भंडारी बोर्डिंगचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी गणपती कारखानदारांना संचारबंदी काळात शासनाने मदत केली पाहिजे. काही कारखानदार यांनी मूर्ती बनवण्याची सुरुवातसुद्धा केली आहे. गणपती कारखानदारांसंदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन मदत करण्याबाबत मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करण्याची सूचना केली, ती तत्काळ मंजूर करण्यात येऊन पत्र देण्याचे ठरवण्यात आले. अतिक खतीब यांनी प्रभागनिहाय कमिट्या बनवून नगर परिषदेमार्फत बाहेरून येणाऱ्यांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
या वेळी पर्यटन व नियोजन सभापती पांडुरंग आरेकर यांनी समिती स्थापन करून त्याचे वाचन केले. या सभेचे अध्यक्षस्थान मुरूड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी भूषविले. सभेसाठी उपनगराध्यक्ष नौशीन दरोगे, विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर, अतिक खतीब, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे आदी उपस्थित होते.

औषधाची दुकाने बंद राहणार
च्व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आंबुर्ले यांनी बाजारपेठ चार दिवस बंद करण्याबाबत व्यापाºयांशी चर्चा झाली असून त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्याचप्रमाणे यापुढे बाजारपेठेतील सर्व दुकाने सोमवार व गुरुवारी बंद राहतील. विशेष म्हणजे चार दिवस बंदमध्ये सर्व औषधाची दुकानेसुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत.
यासाठी औषधाच्या दुकान मालकांनी विशेष सहकार्य करीत असल्याचे या वेळी सांगितले. दुकान बंदबरोबरच लोकांना आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याबाबत विशेष प्रबोधन करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
सोमवारपासून सूचनांची अंमलबजावणी
सभेच्या अध्यक्ष नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी या सभेत मांडलेल्या सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार असून प्रत्यक्ष कार्यवाहीला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक समितीवर समाज अध्यक्षांनासुद्धा घेण्यात येणार आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी या वेळी प्रतिपादन केले.

Web Title: Murud market closed for four days from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.