कशेडी बोगद्यासाठी सुरुंग स्फोट; घरांना बसताहेत हादरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 11:29 PM2020-06-21T23:29:56+5:302020-06-21T23:30:02+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत कशेडी घाटात कातळी गाव हद्दीत बोगदा तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागांतर्गत ठेकेदार कंपनीकडून करण्यात येत आहे.

Mine blast for Kashedi tunnel; The houses are shaking | कशेडी बोगद्यासाठी सुरुंग स्फोट; घरांना बसताहेत हादरे

कशेडी बोगद्यासाठी सुरुंग स्फोट; घरांना बसताहेत हादरे

Next

प्रकाश कदम 
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत कशेडी घाटात कातळी गाव हद्दीत बोगदा तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागांतर्गत ठेकेदार कंपनीकडून करण्यात येत आहे. या बोगद्यात मोठ्या क्षमतेचे सुरुंगाचे स्फोट करण्यात येत आहेत. परिणामी, दोन किलोमीटर अंतरात असलेल्या कातळी, भोगाव बुद्रुक कामतवाडी या गावांतील घरांना हादरे बसत असल्याने धोका निर्माण झाला आहे.
कशेडी घाटात सातत्याने घडणाऱ्या अपघातांमुळे नवीन महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुका हद्दीत कशेडी घाटात केवळ सहा किलोमीटर अंतराचा पोलादपूर शहरापासून भोगाव खुर्द दत्तवाडीपर्यंत रस्ता तयार केला जात आहे. पुढे भोगाव खुर्द भोगाव बुद्रुक या गावाजवळून कामतवाडीच्या डोंगरात दोन बोगद्यांतून जाणारा हा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्याच्या कशेडी गाव हद्दीतील दरेकरवाडीजवळ संपत आहे. येथून एक बोगदा पोलादपूर तालुक्याकडे तर पोलादपूर तालुक्याकडून खेड तालुक्याकडे अशा दोन्ही बाजूंनी बोगद्यांची कामे सुरू आहेत. पोलादपूर बाजूने तयार करण्यात येणाºया बोगद्यात सुरुंग लावण्यात येत आहेत. या सुरुंगाच्या स्फोटांची क्षमता व तीव्रता मोठी असून, याचे हादरे दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या भोगाव बुद्रुक गावातील घरांना बसत आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान केलेल्या सुरुंगांच्या स्फोटांमुळे अंदाजे दोन किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भोगाव बुद्रुक गावातील घरांना मोठे हादरे बसले. परिणामी, घरांच्या भिंती खिळखिळ्या होऊन धोका होण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
>दरड कोसळण्याचा धोका
२००५ मध्ये २५ व २६ जुलैच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमध्ये कामतवाडीवर दोन्ही बाजूने दरडी कोसळल्या होत्या, यात दोन घरांचे नुकसानही झाले होते. तेव्हापासून दरवर्षी पोलादपूर तहसील कार्यालयाकडून पावसाळ्यात नोटीस बजावण्यात येत असून, सुरक्षित जागेत स्थलांतर करण्याची सूचना करण्यात येत असते, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
वास्तविक, कशेडी घाटात मागील कित्येक वर्षांत करण्यात आलेल्या विकास कामांसाठी वेळोवेळी प्रचंड क्षमतेचे सुरुंगांचे स्फोट घडवून आणण्यात आले. त्यामुळे डोंगर खिळखिळा झाला. २००५च्या अतिवृष्टीमध्ये संपूर्ण डोंगराला भेगा पडल्या, पायथ्यापर्यंत मोठे चर पडले. पावसाचे पाणी झिरपून फुगलेली माती दगडधोंड्यांसह खाली घसरली. घरांच्या भिंतींना तडे गेले.
घरांचा पाया खचला. भूवैज्ञानिक आणि भूजल संशोधकांनी केलेल्या पाहणीत हे क्षेत्र भूस्खलन प्रवण असल्याचे जाहीर केले आहे. आजही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, तर या भागात दरडी कोसळतात. अशा या डोंगरात सातत्याने मोठ्या क्षमतेचे सुरुंग लावण्यात आले, तर पावसाळ्यात येथील कामतवाडी आणि भोगाव बद्रुक गावांना धोका संभवतो.
>कामतवाडी या गावाच्या खालून जमिनीच्या पोटातून बोगदा तयार केला जाणार आहे. या बोगद्यात करण्यात येणाºया सुरुंगाच्या स्फोटांमुळे आमच्या घरांच्या भिंती हादरतात. घरांचे पत्रे थडथडतात, कपाटातील भांडी कोसळतात, जर पावसाळ्यात अतिवृष्टी झाली, तर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
- विष्णू सकपाळ, ग्रामस्थ.
>केंद्र सरकारची परवानगी आहे. मात्र, स्फोटांची तीव्रता कमी करण्याची खबरदारी घेऊ.
- महाडकर, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम अधिकारी
>ब्लास्टिंग करण्यास ग्रामपंचायतीची परवानगी देण्यात आली आहे.
- अमोल मोरे, सरपंच कोंढवी ग्रामपंचायत

Web Title: Mine blast for Kashedi tunnel; The houses are shaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.