Mahavitaran attacked; Increase in hospitality in the city | महावितरणवर हल्लाबोल; शहरातील बंदोबस्तात वाढ
महावितरणवर हल्लाबोल; शहरातील बंदोबस्तात वाढ

अलिबाग : महावितरण कंपनीने वेळोवेळी भारनियमन करून दुरुस्तीची कामे केल्याचा दावा करूनही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. नागरिकांच्या मनातील खदखद दूर करण्यासाठी अलिबाग शिवसेना रस्त्यावर उतरून अलिबागमधील महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोमवारी घेराव घालणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून महावितरणने दुरुस्तीच्या नावावर सहा-सहा तासांचे भारनियमन केले होते. मान्सूनपूर्व पाऊस बरसल्याने महावितरणच्या कारभाराची लक्तरे उघडी पडली. सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्रीही विजेचा लपंडाव सुरूच आहे. दुरुस्तीची कामे करूनही आठ-आठ तास वीज गायब होत असल्याने नागरिकांना भलताच मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुरुस्तीची कामे पूर्ण करूनही तारा तुटणे, पोल पडणे, विजेच्या तारांवर झाडे कोसळणे, कंडक्टर तुटणे, डीपीमध्ये बिघाड होणे हे चक्र सातत्याने सुरूच आहे.

अखंड वीजपुरवठा देण्यात महावितरण अपयशी ठरत असली तरी विजेचे बिल मात्र न चुकता आणि वेळेवर येत आहेत. दुपारी वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे विविध व्यावसायिकांचे चांगलेच हाल होत आहेत, तर रात्री वीज गायब होत असल्याने उकाड्यामुळे नागरिकांचेही हाल होत आहेत. याचा सर्वाधिक त्रास महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांना अधिक सोसावा लागत आहे.

वीज गेल्यावर महावितरणच्या तक्रार निवारण कक्षात फोेन केल्यावर तो लागत नाही आणि चुकून लागलाच तर समोरून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. त्यामुळे नागरिकांचा पारा स्वाभाविकपणे वर चढतो. अधिकाºयांना फोन केला तर ते अनोळखी फोन उचलत नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे वीजपुरवठा कशामुळे खंडित झाला आहे. तो कधी पूर्ववत होणार आहे याची काहीच माहिती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये महावितरणच्या विरोधात प्रचंड असंतोष आहे; परंतु प्रत्येक नागरिकांना महावितरणच्या कार्यालयावर धडक देता येणार नाही. हे गृहित धरून अलिबाग शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी सोमवारी अलिबाग येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देणार असल्याचे स्पष्ट केले.

मोर्चामध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विजय कवळे, कामगार नेते दीपक रानवडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, तीन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. तसेच चेंढरे आणि वरसोली ग्रामपंचायतीची निवडणूक २३ जून रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लढा देऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

अधिकाºयाकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे
सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आठ तासांचे भारनियमन करून दर मंगळवारी महावितरण दुरुस्तीची कामे हाती घेत असताना वीज जातेच कशी, असा सवाल राजा केणी यांनी उपस्थित केला आहे. अलिबाग-पेण तालुक्यातील सुमारे ६० हजार ग्राहकांसह रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील लाखो ग्राहकांना हा रोजचाच त्रास झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना महावितरण दाद लागू देत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या स्टाइलने महावितरणच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचे तालुकाप्रमुख राजा केणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.


Web Title: Mahavitaran attacked; Increase in hospitality in the city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.