उड्डाणपुलांवर पाणी निचऱ्याचा अभाव; पनवेल मुंब्रा महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:19 PM2019-09-07T23:19:15+5:302019-09-07T23:19:31+5:30

महामार्गावरील पथदिवेही बंद; अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

 Lack of water drain on flyovers; | उड्डाणपुलांवर पाणी निचऱ्याचा अभाव; पनवेल मुंब्रा महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष

उड्डाणपुलांवर पाणी निचऱ्याचा अभाव; पनवेल मुंब्रा महामार्गावर दुरुस्तीकडे दुर्लक्ष

googlenewsNext

कळंबोली : पनवेल मुंब्रा महामार्गावर कळंबोली येथे टी अ‍ॅण्ड टी कंपनीने बांधलेल्या पुलावर पावसाचे पाणी निचरा होण्याकरीता कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुलावरच पाणी साचून राहत आहे. याच पाण्यातून दुचाकी, चारचाकीसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

तसेच पुलावरील खांबातून पाणी झिरपत असल्याने ते कमकुवत होत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यास चालकांना अंदाज येत नसल्याने वाहने उसळून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे पुलावर पडलेले खड्ड्यांची त्वरित डागडुजी
करण्याची मागणी चालकांकडून होत आहे.

पनवेल-मुंब्रा महामार्गावर कळंबोली स्टील मार्केट लगत ६१. ३७ कोटी खर्चून पूल बांधण्यात आला आहे. पुलाची लांबी ११३० मीटर आहे. महामार्गालगत लोह-पोलाद मार्केट असल्याने सतत अवजड वाहतूक सुरू असते.

उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी फुटली. मात्र, पुलावर पडलेल्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने ते तिथेच साचते. साचलेले पाणी काही प्रमाणात पुलात झिरपते. त्यामुळे उड्डाणपूल कमकुवत होत आहे.पाणी साचल्यामुळे खड्डेही पडले आहेत. याशिवाय उड्डाणपुलावरील पथदिव्यांचे बिल कोणी भरायचे? यावरून रस्ते विकास महामंडळ व सिडको, महापालिका यांच्या वाद सुरू असल्याने पथदिवे बंद आहेत. त्यामुळे साचलेले पाणी तसेच उड्डाणपुलावरील खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. वाहने खड्ड्यात आदळून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलावरील पाणी निचरा करण्याकरिता पाइप लावणे आवश्यक होते; परंतु हा उड्डाणपूल बांधताना प्लम्बिंग करण्यात आली नाही. त्यामुळे पुलावरसुद्धा पावसाचे पाणी साचत आहे. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही महिन्यातच अशाप्रकारे अवस्था झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

खांदा वसाहतीत बांधण्यात आलेल्या पुलाचीही हीच अवस्था आहे. येथे ही वरून पावसाचे पाणी पडत आहे. याला सर्वस्वी रस्ते विकास महामंडळ जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेकाप प्रणित महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे खजिनदार भूषण म्हात्रे यांनी दिली.

कळंबोली अंडरपास सुद्धा पाण्यात
पनवेल - मुंब्रा उड्डाणपुलाखालून कळंबोली गावात जाण्याकरिता सात मीटरचा अंडरपास बांधण्यात आला आहे. येथून पादचारी आणि हलकी वाहने जाऊ शकतात. या अंडरपास मध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचत आहे. साचलेले पाणी निचरा होण्याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे साचलेल्या पाण्यातूनच कळंबोलीकरांना मार्ग काढावा लागत आहे. या बाबत उपाययोजना करण्याची मागणी कळंबोलीकर करत आहेत. खड्ड्यात पाणी साचल्यावर खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहने उसळत असल्याने अपघात होत आहेत.

Web Title:  Lack of water drain on flyovers;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.