Kovid Hospital at Alibag, Mangaon; Costs will be incurred through CSR | अलिबाग, माणगाव येथे कोविड रुग्णालय; सीएसआरच्या माध्यमातून होणार खर्च

अलिबाग, माणगाव येथे कोविड रुग्णालय; सीएसआरच्या माध्यमातून होणार खर्च

- आविष्कार देसाई

रायगड : जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर जिल्हा प्रशासनाने सीएसआरच्या माध्यमातून तोडगा काढला आहे. रुग्णांच्या सेवेसाठी अलिबाग येथील सरकारी रुग्णालयामध्ये १०० बेडची, तर माणगाव येथे ५० बेडची सुसज्य आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहे, परंतु पायाभूत सुविधा उभारताना दुसरीकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवणार असल्याने, एवढा मोठा डोलारा उभा करून उपयोग होणार का, असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आरोग्याच्या बऱ्यापैकी सोयी उपलब्ध आहेत. मात्र, त्याही हाउसफुल झाल्या आहेत. उर्वरित रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच रामभरोसे असल्याचे चित्र आहे. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्थेचे हात तोकडे पडत आहेत. त्यामुळे रुग्णांना पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. सध्या रुग्णालय फुल असल्याने काही रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजे घरीच उपचाराचा सल्ला दिला जात आहे.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये तब्बल १०० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामध्ये ४० आयसीयू बेड आणि उर्वरित आॅक्सिजन बेड उभारण्यात येत आहेत. बेडची व्यवस्था सरकारी खर्चातून होणार आहे, तर आयसीयू आणि आॅक्सिजन बेडसाठी लागणाºया आॅक्सिजन लाइनचे काम, तसेच अन्य काम हे सीएसआरमधून करण्यात येत आहे. माणगाव येथील सरकारी रुग्णालयामध्येही १० आयसीयू बेड उभारण्यात येत आहेत. त्या ठिकाणी १० व्हेंटिलेटर मशीनची सुविधा उभी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, ५० आॅक्सिजन बेड उभारण्यात येत असल्याने दक्षिण रायगडमधील रुग्णांसाठी सोयीचे होणार आहे.
आयसीयूमध्ये ठेवण्यात येणारे बेड हे अत्याधुनिक असणार आहेत. सुमारे ४० हजारांपासून ते सव्वा लाख रुपये किमतीचे हे बेड राहणार आहेत, तसेच आॅक्सिजन बेडचा दर्जाही चांगलाच राखण्यात येणार आहे. अलिबाग सरकारी रुग्णालाकडे सध्या ४५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे सुसज्य सुविधांनी युक्त असे हे रुग्णालय होणार आहे. त्यामुळे मुंबई अथवा नवी मुंबईमध्ये रुग्णांना उपचारासाठी पाठवावे लागणार नाही.
दरम्यान, नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर असे नियम काटेकोर पाळावेत. अंगावर दुखणे न काढता, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

अत्याधुनिक रुग्णालय
कंपन्यांच्या सीएसआर निधीतून हे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येत आहे. यासाठी त्यांचीच यंत्रणा काम करत आहे. आयसीयू आणि आॅक्सिजन बेडपर्यंत आॅक्सिजन पोहोचविण्याची यंत्रणा उभारणे, तसेच अन्य आवश्यक घटकांची उभारणी सीएसआरमधून करण्यात येत आहे.

आॅक्सिजन बेडसाठी सरकारी कोट्यातून खर्च
आयसीयू आणि आॅक्सिजन बेडसाठी सरकारी कोट्यातून खर्च करण्यात येणार आहे. अलिबाग येथील रुग्णालयामध्ये बसविण्यात येणाºया ४० पैकी किमान १० बेड हे अत्याधुनिक असणार आहेत. त्यातील एका बेडची किंमतही ४० हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत आहे. अशा बेडमुळे संबंधित रुग्णाजवळ कमी मनुष्यबळाची आवश्यकता भासते.

आठ दिवसांमध्ये होणार उभारणी
अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या मागील बाजूस सध्या आयसोलेशन सेंटर आहे. त्या ठिकाणची क्षमता कमी असल्याने, दुसºया मजल्यावर स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांमध्ये अलिबाग आणि माणगाव येथील रुग्णालये सुरू करण्याचा प्रयत्न आरोग्य प्रशासनाचा आहे.


अलिबाग आणि माणगाव येथे १५० बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. पुढील आठ दिवसांमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यामुळे रु ग्णांना मुंबई पाठवण्याची गरज पडणार नाही. जिल्ह्यातच उपचाराची सोय होणार आहे. वर्ग-४ आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासत आहे. ती भरून काढण्याकडेही लक्ष दिले जात आहे.
- डॉ.सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

Web Title: Kovid Hospital at Alibag, Mangaon; Costs will be incurred through CSR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.