जिल्ह्यात कोरोनाकाळात घटले डेंग्यू तापाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 02:26 AM2021-02-08T02:26:08+5:302021-02-08T02:26:33+5:30

उपाययोजनेसाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषयक पथक तयार

The incidence of dengue fever decreased during the Corona period in the district | जिल्ह्यात कोरोनाकाळात घटले डेंग्यू तापाचे प्रमाण

जिल्ह्यात कोरोनाकाळात घटले डेंग्यू तापाचे प्रमाण

googlenewsNext

- निखिल म्हात्रे

अलिबाग : कोरोनाकाळात इतर आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच या कालावधीत डेंग्यूला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर आरोग्यविषय़क एक पथक तयार करून उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असला, तरी डेंग्यू तापाचे प्रमाण घटले आहे.

रायगड जिल्ह्यात जून ते फेब्रुवारी या नऊ महिन्यांच्या कालावधीत फक्त १० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे दोन रुग्ण उपचार घेत आहे, तर उर्वरित पाच जण डेंग्यूसदृश म्हणून उपचार घेत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील डेंग्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. कोरोना कालावधीत न भासलेली पाणीटंचाई आणि कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबल्यामुळे डेंग्यू आटोक्यात आल्याचीही यामागची मुख्य कारणे आहेत.

पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यूसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातात. पण, जिल्ह्यातील अनेक भागांत उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे पावसाचे पाणी टंचाईग्रस्त भागांमध्ये घराघरांत साठवून ठेवले जाते. मात्र, या पाण्याची साठवण करताना पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढते. डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो. मात्र, यावर्षी डेंग्यू आटोक्यात आणण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. ज्या ठिकाणी बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्या ठिकाणी पाण्याची साठवण केली जात असते. या पाण्यात डासांची उत्पत्ती होते.  हिवताप आणि डेंग्यूसारखे आजार बळावतात. 

डेंग्यूविषयी शहरभर सर्वेक्षण; नागरिकांनी या उपाययोजना कराव्यात
नागरिकांनी यावर उपाययोजना म्हणून पाणी १५ मिनिटे उकळून व गाळून प्यावे. स्वतःसह परिसराची स्वच्छता राखावी. ताजे आणि गरम अन्‍नच खावे. दिवसातून किमान पाच लीटर पाणी प्यावे. सार्वजनिक ठिकाणी रूमाल, मास्क वापरावा. सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या, घरातील भांडी स्वच्छ ठेवावी. डासांपासून स्वसंरक्षण करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, अशा उपाययोजना केल्या तर साथीचे आजार दूर राहू शकतात. कामानिमित्ताने जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण मोठे आहे. कामानिमित्ताने सातत्याने स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक सकाळी वाढणारे तापमान तर काही वेळानंतर पडलेल्या थंडीमुळे वातावरणात अचानक बदल झाला आहे. सततच्या बदलणा-या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी कावीळ, अतिसार व घशाच्या आजाराने त्रस्त असलेले २५ ते ३० रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूच्या एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
-डॉ. राजीव तंबाळे, 
वैद्यकीय अधिकारी (सामान्य रुग्णालय)

डेंग्यूची लक्षणे
अचानक तीव्र ताप येणे
तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी
अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे व 
तोंडाला कोरड पडणे
उलट्या होणे, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी सुरू होणे
अंगावर पुरळ येणे, लाल चट्टे उठू लागतात

Web Title: The incidence of dengue fever decreased during the Corona period in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.