कर्जतमधील राजकीय चढाओढ उट्टे काढण्यासाठी की मदतीसाठी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:59 AM2019-09-19T00:59:51+5:302019-09-19T00:59:58+5:30

कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे.

To help with the political upheaval in debt or to help? | कर्जतमधील राजकीय चढाओढ उट्टे काढण्यासाठी की मदतीसाठी?

कर्जतमधील राजकीय चढाओढ उट्टे काढण्यासाठी की मदतीसाठी?

Next

- कांता हाबळे 
नेरळ : कर्जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार होण्यासाठी चढाओढ असल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक आपली उमेदवारी पक्षाकडे नोंद करीत आहेत. त्यात आघाडी तसेच शिवसेना आणि भाजपमध्ये इच्छुक वाढले असतानाच आता तिकडे शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेनंतर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा कर्जत मतदारसंघात येत आहे. दरम्यान, कर्जत विधानसभा मतदारसंघ नक्की कुणाचा बालेकिल्ला हे या विधानसभा निवडणुकीनंतर जाहीरपणे स्पष्ट होणार आहे; पण मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पाडले आणि कोणी कोणाला मदत केली यांची गणिते बांधली जात असून त्यानुसार उट्टे काढण्याची रणनीतीही आखली जात असेल यात शंका नाही.
कर्जत या दोन लाख ८९ हजार मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक प्रमाणात राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-आरपीआय (आठवले गट) यांच्या महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-मनसे यांची आघाडी अशी लढत झाली होती. त्या वेळी मतांची झालेली गोळाबेरीज ही आघाडी आणि युतीसाठी फारशी दिलासादायक बाब नाही. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघ नक्की कुणाचा बालेकिल्ला आहे हे या निवडणुकीत अधोरेखित होणार आहे. कारण, एकेकाळी या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी तीन वेळा आमदारकी मिळविली आहे. त्यामुळे आमचाच बालेकिल्ला म्हणणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना लोकसभा निवडणुकीत करून दाखवता आले नसल्याने कर्जत विधानसभा निवडणुकीत चुरस आहे. कर्जतमध्ये लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी यांची लढत असली तरी कोणीही आपला बालेकिल्ला म्हणू शकत नाही, अशी स्थिती या मतदारसंघात सर्व राजकीय पक्षांची आहे.
कर्जतमध्ये सर्व जण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे. कारण विधानसभा निवडणुकीची तारीख झाली नसल्याने प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विधानसभा निवडणुकीतील आमने-सामने उभे राहणाºया दावेदार पक्षांनी आतापासून दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीमध्ये आमदार असलेले सुरेश लाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे; पण त्यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कामगार पक्षाने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा विरोध हा आमदारकीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत केले होते; परंतु स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापला राष्ट्रवादीने आसमान दाखवले आहे हे शेकाप विसरले नसेल, अशीही चर्चा आहे. तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन्य पक्षात प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे सुरेश लाड यांची मते आपोआप कमी होणार आहेत; पण राष्ट्रवादीमधील अन्य इच्छुक असलेले दत्तात्रेय मसुरकर यांनी आपण जिल्हाध्यक्ष असलो तरी इच्छुक आहोत. मात्र, त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीमधून ठपका ठेवण्यात आला होता, हा ठपका कोणी ठेवला त्यांचे ते उट्टेदेखील काढू शकतात.
शिवसेनेतही असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे. कारण शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इच्छुकांची रांग आहे. इच्छुक हे कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांचे काम करू असे म्हणत आहेत; पण मागील दोन्ही निवडणुकांत एकमेकांना पाडणारे खरोखर मदत करतील की मागील पराभवाचे उट्टे काढतील, हे निवडणुकीनंतर कळणार आहे. त्यात शिवसेनेत जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्क प्रमुख यांना बदलले गेले. त्यामुळे त्यांचा राग ते आपल्या समर्थक यांच्या माध्यमातून काढतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील जुनी भांडणे यांचा राग मतपेटीतूनही बाहेर येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत कमी मतदार याबद्दलही वेगळी पावले उमेदवार निश्चित झाल्यानंतर उचलली जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवार यांच्यासमोर पक्षांतील नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान असेल. त्यात शिवसेनेमधील आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या मोठी वाढली आहे. विद्यमान उपजिल्हाप्रमुख भाई गायकर विधानसभा मतदारसंघ संघटक संतोष भोईर, माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे, तालुका संपर्कप्रमुख सुदाम पवाळी, माजी सरपंच संतोष कोळंबे आणि नेरळ शाखेचे शहरप्रमुख रोहिदास मोरे अशी नावे समोर आली आहेत. त्यात उमेदवार म्हणून आघाडीवर महेंद्र थोरवे यांचे नाव सध्या तरी आघाडीवर असून शिवसेना आणि भाजप यांची युती झाली नाही तर मग काय होणार हा प्रश्न शिवसैनिकांना सतावत आहे. त्यामुळे मागील कटकारस्थाने त्यांमुळे फटका बसलेले कार्यकर्ते शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या दोन्ही उमेदवार यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: To help with the political upheaval in debt or to help?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.