पूर ओसरला, मात्र अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 01:51 AM2019-07-29T01:51:20+5:302019-07-29T01:51:57+5:30

जनजीवन पूर्वपदावर : जागोजागी चिखलाचे साम्राज्य

 The flood was over, but the dam of tears burst | पूर ओसरला, मात्र अश्रूंचा बांध फुटला

पूर ओसरला, मात्र अश्रूंचा बांध फुटला

Next

आविष्कार देसाई

पेण : जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडवून देत अनेकांचे संसार उद्ध्वस्त करत रस्त्यावर आणले आहेत. पुराचे पाणी ओसरल्याने जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी कपडे, भांडी, गुरे, ढोरे आणि माणसेही वाहून गेली आहेत. हळूहळू आता जनजीवन पूर्वपदावर येईलही परंतु पुराच्या पाण्यात ज्यांनी आपले संसार वाहून जाताना पाहिले आहेत, ज्यांनी कुटुंबातील सदस्य गमावला आहे त्यांच्या घरी फक्त आक्रोशच होता. अश्रूंच्या धारांचा बांध फुटल्याने गावच्या गाव दुखाच्या महापुरात बुडाली होती.

सतत पडणाऱ्या पावसाच्या तडाख्याने जनजीवन पुरते ढवळून निघाले आहे. पुढील कालावधीत अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने आपत्तीची टांगती तलवार रायगडकरांवर लटकलेलीच आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या चार दिवस बरसणाºया पावसामुळे अलिबाग, पेण, महाड, रोहा, नागोठणे, माणगाव या ठिकाणी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. पाणी नागरी वस्त्यांंतील घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. पाण्याच्या प्रवाहामुळे गावातील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. तो आता पूर्ववत करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील शेलू येथील ४०४ नागिरक, सोलणपाडा येथील ३५ घरांतील १५६ नागिरक आणि रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील झोपडपट्टीतील ३५ घरांतील ८४ नागरिकांचे स्थलांतर समाजमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय अशा ठिकाणी करण्यात आले होते. त्यांना अन्नाची पाकिटे प्रशासनामार्फत देण्यात आली आहेत. यासाठी रायगड पोलीस दल मदत करत आहे. पावसामुळे ज्यांच्या घराचे, गोठ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना दिल्या आहेत. ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. तेथील नागरिक घरातील पाणी बाहेर काढण्याच्या कामात सकाळपासून व्यस्त होेते. पाऊस कमी झाल्याने पूर परिस्थिती नियंत्रणात आलेली असल्याने संबंधितांना त्यांच्या घरी जाण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून लवकरच सूचना देण्यात येतील असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर
जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून १३ व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यामध्ये शनिवारी २७ जुलै रोजी अलिबाग-चौल येथील यश म्हात्रे (१९) हा पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेला आहे. त्याचा शोध पोलीस स्थानिकांच्या मदतीने घेत आहेत. त्यामुळे आतापर्यंत पावसाने १२ जणांचा बळी घेतला आहे. मृतांच्या घरी आक्रोश होता. अख्खे गाव दुखाच्या महासागरात बुडाले होते. आपत्तीने संसार उद्ध्वस्त केलेत त्यांचे संसार उभे राहतीलही मात्र ज्याचा भाऊ, वडील, नवरा, मुलगा मृत पावला. तो कधीच परत येणार नसल्याने त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासन आर्थिक मदत करेल, मात्र कुटुंबातील सदस्य परत येणार नाही.

रेस्क्यू आॅपरेशन
पोलादपूर येथे रात्री नऊच्या सुमारास राजेंद्र विश्राम शेलार (२६) हा पोलादपूरपासून सुमारे २५ किलोमीटर लांब असणाºया कुडपन बुद्रुक या गावाकडे जाणाºया जगबुडी नदीच्या छोट्या पुलाखाली अडकून पडला होता. सुमारे तीन तास हे बचावकार्य सुरू होते. परंतु राजेंद्र याचा मृत्यू झाला होता. नेरळ येथील निकोप फार्महाउसमध्ये पाच जण अडकून पडले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.

गेले तीन दिवस प्रशासन, रायगडचे पोलीस झोपलेच नाहीत
गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने जिल्ह्यातील विविध छोट्या-मोठ्या नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले होते. या धोक्याच्या ठिकाणहून वाहतूक होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कायमस्वरुपी तैनात केले होते. तसेच रात्रभर पेट्रोलींग करुन ज्या महामार्गावार जिल्ह्यातील अंतर्गत मार्गावर दरड अथवा वृक्ष कोसळले होते. तेथे जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, काही स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे जास्त कालावधीसाठी वाहतूकीचा खोळंबा झाला नाही.

माणगाव तालुक्यात पूर परिस्थिती
माणगाव तालुक्यात दोन दिवस सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे माणगांव तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळित होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. माणगाव शहरात रस्त्याच्या कडेला असणाºया घरांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहेत. माणगाव शहरात उपजिल्हा रुग्णालय, अशोकदादा साबळे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये, कचेरी रोड, बामणोली रोड, माणगांव रेल्वे स्टेशनकडे जाणार रस्ता सर्वत्र गावांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. माणगांव शहर पूर्ण जलमय झाल्याचे चित्र दिसत आहे. या सतत पडत असलेल्या पावसामुळे गोरेगाव , इंदापूर, निजामपूर व सर्व ग्रामीण भागातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून माणगांव तालुक्यात संपूर्ण पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या मुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे

पुराचा तडाखा मोठा असल्याने वाटेत येणारे सर्व काही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले होते. परंतु सर्वत्र जागोजागी चिखलाचे साम्राज्य पसरले होते. कपडे, भांडी असे विविध साहित्य चिखलामध्ये माखले होेते. पुलांच्या संरक्षक कठड्यांवर देखील मोठ्या प्रमाणात कचरा, प्लॅस्टिक, झाडे अडकून पडली होती. पुराचा तडाखा मोठा असल्याने संसारासोबतही त्यांची उमेदही वाहून गेली होती.

Web Title:  The flood was over, but the dam of tears burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.