महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 05:45 PM2021-07-31T17:45:05+5:302021-07-31T17:46:04+5:30

सावित्री नदीला आलेल्या महापुराने महाड उध्वस्थ केले आहे. अद्यापही महाडमध्ये विविध संस्था, प्रशासन स्वच्छता करत आहेत.

Eknath Shinde himself took initiative to clean the Mahad city | महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला

महाडच्या स्वच्छतेसाठी स्वत: एकनाथ शिंदे उतरले रस्त्यावर; ४५० कर्मचारी, २० जेसीबी, २० डंपर, घंटागाड्या मदतीला

googlenewsNext

सिकंदर अनवारे
लाेकमत न्यूज नेटवर्क
दासगाव ः सावित्री नदीला आलेल्या महापुराने महाड उध्वस्थ केले आहे. अद्यापही महाडमध्ये विविध संस्था, प्रशासन स्वच्छता करत आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आज महाडच्या रस्त्यावर उतरले. शहरातील स्वच्छतेसाठी तब्बल दीड काेटी रुपयांचा वाढीव निधी त्यांनी जाहीर केला.मुसळधार पावसाचा मोठा फटका महाडला बसला आहे.

महाड शहरात आणि बाजारपेठेत तब्बल 15 फुटांपर्यंत पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर शहर स्वच्छ करणे हे प्रमुख काम हाेते. महाड नगर पालिकेची क्षमता मर्यादित असल्याने या कामासाठी स्वतः नगरविकास मंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिकेचे १५० सफाई कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिकेचे १२० सफाई कर्मचारी, पनवेल महानगरपालिकेचे १०० सफाई कर्मचारी, टीडीआरएफ पथकाचे ३० जवान असे मनुष्यबळ या स्वच्छता कामासाठी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महापालिकेने पाठवलेले ड्रनेज लाइन स्वच्छ करणारे टँकर्स, २० जेसीबी, २० डंपर, पाच घंटागाड्या, ठाणे महापालिकेची काही जेटिंग मशिन्स, ठाणे मनपाचे तीन फायर टँकर्स, महाड नगरपालिकेचे तीन फायर टॅंकर्स, तसेच ठाणे व खोपोली वरून घरे स्वच्छ करण्यासाठी आणण्यात आलेले स्प्रेइंग मशीन, रोगराई पसरू नये यासाठी धूरफवारणी करणारी फॉगिंग मशिन्स अशा समुग्रीचा समावेश आहे. 

शनिवारी सकाळी नऊ वाजता शिंदे यांनी जिल्हा मदत केंद्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येकाला जबाबदारी नेमून दिली. महाड शहरात पूर ओसरल्यानंतर 19 लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आढळले आहेत. ही साथ वाढू नये, तसेच इतर रोगही शहरात पसरू नयेत. यासाठी आपण स्वतःच या स्वच्छता कामासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित केली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पुढील दोन दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, रायगडटे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, महाड शहराचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महाड शहराला स्वच्छतेसाठी वाढीव दीड कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी यापूर्वीच ५० लाखांची मदत जाहीर केली होती, मात्र झालेले नुकसान पाहाता ती पुरेशी नसल्याचं निदर्शनास आल्याने वाढीव दीड कोटी रुपये देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे हि रक्कम दाेन काेटी रुपये झाली आहे.

Web Title: Eknath Shinde himself took initiative to clean the Mahad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.