चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:10 AM2020-06-05T05:10:49+5:302020-06-05T05:11:00+5:30

ठिकठिकाणी पंचनामे सुरू; मुंबई-ठाण्यासह नाशिक, पुण्यातही दणका

The cyclone caused crores of rupees in Raigad | चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये कोट्यवधींचे झाले नुकसान

Next

लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग : निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरुड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्याला बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर पडलेले झाडे काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले आहेत.


चक्रीवादळामुळे मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील मोबाईल नेटवर्क बंद पडले होते, तर वीजप्रवाह पूर्ण बंद करण्यात आला होता. अलिबाग तालुक्यातील उमटे येथील दशरथ वाघमारे (५८) महावितरणचा पोल पडून, तर श्रीवर्धन मध्ये भिंत पडून एक असे दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच शेतातही पावसामुळे पाणी साचले.


या वादळाचा रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिकसह पुणे आणि नगर जिल्ह्यातील काही भागातही जोरदार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जिल्ह्यात ‘निसर्ग’चा प्रभाव कमी झाला असला तरी पावसाचा जोर कायम आहे. रत्नागिरीत गेल्या २४ तासात सरासरी ९३.४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड, दापोली, चिपळूण व मंडणगड या तालुक्यांमध्ये घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्गात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक १०८ मि.मी पाऊस झाला.


नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. पेठ, नांदगाव वगळता उर्वरित १३ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. इगतपुरी, सिन्नरमार्गे पुढे मार्गस्थ झालेल्या या चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा या दोन्ही तालुक्यांना बसला असून, सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झााली आहे. यामुळे ५६ जनावारे दगावली आहेत, तर १९१ हेक्टरवरील पिकांचेही नुकसान झाले.
अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. पुणे जिल्ह्यात १६०० घरे, ५७ अंगणवाडी, ३१ शाळा आणि ४ ग्रामपंचायत इमारतींचे नुकसान झाले आहे. याशिवाय ४०२ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

१८,८८७
नागरिक स्थलांतरित

च्मुरुडला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईलाही फटका बसला. निसर्ग वादळामुळे वारा वाहत असताना, पाऊस पडत असताना ९ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. १९६ ठिकाणी झाडे कोसळली. तर २० ठिकाणी शॉर्ट सर्किट झाले. यावेळी ३५ ठिकाणी तात्पुरते निवारे म्हणून महापालिकेच्या शाळा उघडण्यात आल्या.
च्समुद्र किनारी राहत असलेल्या १८ हजार ८८७ नागरिकांना येथे स्थलांतरित करण्यात आले होते. आता या नागरिकांचे स्क्रिनिंग केल्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले जात आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळतील त्यांना आरोग्य केंद्रात पाठविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: The cyclone caused crores of rupees in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.