छोट्या व्यावसायिकांचे संकट दूर, उदरनिर्वाहासाठीची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 02:17 AM2020-11-26T02:17:39+5:302020-11-26T02:17:59+5:30

बल्लाळेश्वर मंदिर खुले

The crisis of small businesses is over, the struggle for subsistence | छोट्या व्यावसायिकांचे संकट दूर, उदरनिर्वाहासाठीची धडपड

छोट्या व्यावसायिकांचे संकट दूर, उदरनिर्वाहासाठीची धडपड

Next

विनोद भोईर

पाली : अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेले पालीतील बल्लाळेश्वर मंदिर तब्बल ८ महिन्यांनंतर सोमवारी (ता. १६) भाविकांसाठी खुले झाले. आता येथे भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे इतके महिने आर्थिक विवंचनेत असलेल्या येथील शेकडो छोट्या-मोठ्या व्यावसाईकांना खूप दिलासा मिळाला आहे. तसेच देवस्थान कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्नदेखील मार्गी लागला आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर १५ मार्चपासून भाविकांसाठी बंद केले आणि येथील सर्व व्यवसायिकांची दुकाने, हॉटेल व हातगाड्यादेखील बंद झाल्या होत्या. मंदिर आज ना उद्या उघडेल या आशेवर बसलेले हे लोक तब्बल आठ महिने उदरनिर्वाहासाठी धडपडत होते. मंदिर परिसरात हार, फुले, पेढे, खेळणी, सरबत, वडापाव, चहावाले, पापड, मिरगुंड, फळे, शोभिवंत वस्तू विकणारी १०० ते १२५ दुकाने व हातगाड्या आहेत. तसेच छोटे-मोठे हॉटेल व लॉज व्यावसाईक, पानटपऱ्या आहेत. हजारो लोक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या यावर अवलंबून आहेत. गेल्या ८ महिन्यांपासून या सर्वांची परिस्थिती हालाखाची होती.
दिनेश गुप्ता या वडापाववाल्यांनी सांगितले की, मंदिर बंद असल्याने इतके दिवस उपासमारीची वेळ आली होती. तर रणजीत खोडागळे या व्यावसायिकाने सांगितले, या कालावधीत उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नव्हते त्यामुळे घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. मनोज मोरे या व्यवसायिकाने म्हटले, रोजच्या रोज धंदा करणाऱ्या लोकांची परिस्थिती बिकट झाली होती. तसेच रोजचे उत्पन्न घटल्याने साठविलेल्या पैशांवर दिवस काढले. 

कठीण परिस्थितीत श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ५ लाखांचा निधी दिला. अन्नछत्र सुरू केले होते. मंदिर खुले झाल्याने सर्वच आनंदी आहेत. आता कर्मचाऱ्यांचा पगार देणे व रोजचा खर्च भागविणे काही प्रमाणात सुलभ होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला गती आणि चालनादेखील मिळेल.
- ॲड. धनंजय धारप, अध्यक्ष, 
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट

मागील आठ महिन्यांपासून आम्ही मंदिरे उघडण्याची वाट पाहत होतो. आता मंदिरे उघडल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. त्यामुळे व्यवसाय वृद्धीदेखील होणार आहे.
- जयश्री पोंगडे, व्यावसायिक

Web Title: The crisis of small businesses is over, the struggle for subsistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.