४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार कोविशिल्ड लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 01:11 AM2021-01-16T01:11:10+5:302021-01-16T01:11:27+5:30

डॉ. किरण पाटील यांची माहिती

Covishield vaccine to be given to 400 health workers | ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार कोविशिल्ड लस

४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार कोविशिल्ड लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शनिवार १६ जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी १ आणि पनवेल येथील २, अशा ४ केंद्राच्या माध्यमातून ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी १५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. किरण पाटील बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने उपस्थित होते. रायगड जिल्ह्याला १३ जानेवारी रोजी ‘कोविशिल्ड’ व्हॅक्सिनचे ९ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहेत. १६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होईल. अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुक्यातील एमजीएम मेडिकल कॉलेज व वायएमटी हॉस्पिटल अशा ४ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ४ केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर हळूहळू या लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याची माहिती डॉ. किरण पाटील यांनी दिली. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार तसेच डोस दिल्यानंतर अर्धा तास त्या व्यक्तीला थांबवून ठेवले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

कोविड अ‍ॅपवर नोंद
कोविड अ‍ॅपवर रायगड जिल्ह्यातील 
८ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती 
डॉ. किरण पाटील यांनी दिली. पहिल्या टप्प्यात गरोदर महिला, १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व्यक्ती, अ‍ॅलर्जिक रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

Web Title: Covishield vaccine to be given to 400 health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड