coronavirus: रायगड जिल्ह्यातून परप्रांतीयांसाठी परिवहनच्या बसेस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 02:42 AM2020-05-15T02:42:32+5:302020-05-15T02:43:06+5:30

रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात निघालेले लोक पाहिल्याने कर्जत तालुक्यातील कळंब येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली तेव्हा ते सर्व उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील राहणारे आहेत तर काही महाराष्ट्र राज्यातील जळगाव, पाचोरा, धरणगाव, मुक्ताईनगर या भागातील असून आपल्या गावी चालत निघाले असल्याचे समजले.

coronavirus: Transport buses ready for Migrant from Raigad district | coronavirus: रायगड जिल्ह्यातून परप्रांतीयांसाठी परिवहनच्या बसेस सज्ज

coronavirus: रायगड जिल्ह्यातून परप्रांतीयांसाठी परिवहनच्या बसेस सज्ज

Next

- विजय मांडे
कर्जत - लॉकडाउनमुळे वेगवेगळ्या भागात अडकलेल्या मजूर कुटुंबांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी पायी वाट धरली आहे. पायी चालताना प्रचंड ऊन आणि त्रास सहन करत घरी पोहोचण्याचा ही कुटुंबे प्रयत्न करत आहेत. तेव्हा या मजूर कुटुंबांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी प्रशासन पुढे सरसावले आहे. कर्जत तालुक्यातून नुकत्याच ३२५ मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. तालुक्यात आणखी मजूर असून त्यांनीही नावनोंदणी केली आहे. त्यांना लवकरच त्यांच्या गावी सोडले जाणार आहे.

रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात निघालेले लोक पाहिल्याने कर्जत तालुक्यातील कळंब येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी विचारपूस केली तेव्हा ते सर्व उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील राहणारे आहेत तर काही महाराष्ट्र राज्यातील जळगाव, पाचोरा, धरणगाव, मुक्ताईनगर या भागातील असून आपल्या गावी चालत निघाले असल्याचे समजले. याविषयी माहिती कळताच कळंब पोलीसचौकीत कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली. त्या सर्वांची आरोग्य तपासणी कळंब आरोग्यकेंद्राचे अधिकारी डॉ. नीलेश यादव तसेच डॉ. योगेश पाटील यांनी करून त्या सर्वांची राहण्याची व्यवस्था कळंब पोलीस स्टेशनच्या आवारात करण्यात आली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या पाच बसेस त्या ११० मजुरांना कळंब येथून घेऊन रावेत, गोंदिया, या ठिकाणी रवाना झाल्या. अशोक शिंदे, विठ्ठल शामे, संदीप गावडे, देवराज, सुखदेव सांगळे, हे चालक म्हणून तर सुरेश पाटील, रोहन कोवे, संदीप वारे, शिवाजी मिसाळ, उत्तम कांबळे हे या बसचे वाहक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक बसमध्ये सीटवर एक व्यक्ती असे २२ जण, अशी सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे तर पनवेल येथून सुटलेल्या मध्यप्रदेश राज्यात जाणाºया ट्रेनमधून कर्जत तालुक्यातील १३६ श्रमिक मजुरांनी प्रवास सुरू केला आहे. त्या सर्व मजुरांना कर्जत येथून एसटीने पनवेल येथे नेण्यात आले आणि नंतर सायंकाळी ६ वाजता पनवेल
येथून मध्यप्रदेशकरिता गाडी रवाना झाली.

लॉकडाउनच्या काळात जे काही मजूर आहेत. ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने पायी चालत आपल्या गावी निघालेले आहेत. तेव्हा असे कोणी आपल्याला दिसल्यास त्यांची विचारपूस करून त्यांना भुकेची गरज भागवून आॅनलाइन फॉर्म भरून देण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. कारण हातावर कमवून खाणारा हा मजूर वर्ग आहे. सध्या त्यांच्याकडे पैसेदेखील नाहीत, तेव्हा माणुसकीच्या नात्यातून आपण त्यांची मदत करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कळंब पोलीसचौकीत थांबलेल्या लोकांना एसटीच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच कर्जत परिसरातील मध्यप्रदेश राज्यातील मजुरांना पनवेल येथे पाठवून देण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
- वैशाली परदेशी, उपविभागीय अधिकारी

अनेक अडचणींचा करताहेत सामना
१कर्जत, खालापूर तालुक्यातील परिसरात लॉकडाउनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजूर तसेच महाराष्ट्र राज्य अंतर्गत निवासी मजूर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पायी चालत आपल्या गावाची वाट धरू लागले.
२असंख्य मजूर कुटुंबांनी अनेक किलोमीटरची पायपीट आपल्या घराच्या ओढीने सुरू केली, रस्त्यात ठिकठिकाणी अनेक अडचणींचा सामना करत त्यांची वाटचाल सुरूच आहे.
३त्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील वेगवेगळ्या भागात अडकून पडलेल्या मजुरांना प्रशासनाने त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी परिवहन महामंडळाच्या एसटी बसची व्यवस्था करून त्यांना इच्छित स्थळी रवाना करण्यात येत आहे.
४कर्जत तालुक्यात खोपोली, खालापूर येथील औद्योगिक क्षेत्रात काम करणारे सुमारे १९१ जण कर्जत तालुक्यातुन कर्जत मुरबाड महामार्गे आपल्या गावी चालत निघाले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात निघाले आहेत.

महाडमधून परप्रांतीयांसाठी १४ बसेस रवाना

दासगाव : महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये असंख्य परप्रांतीय मजूर, कामगार गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत. या सर्वाना आपल्या स्वगृही पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सीमा ज्या राज्यांना जोडल्या आहेत अशा मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथील मजुरांना, नागरिकांना सीमेपर्यंत सोडण्यासाठी महाड आगारातून बुधवारी १४ बसेस सोडण्यात आल्या, या सर्व प्रवाशांना पाणी, मास्क, खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले. मध्यप्रदेशमध्ये जाणाºया नागरिकांना पनवेलपर्यंत सोडण्यासाठी १० बसे सोडण्यात आल्या. गुजरातकडे जाणाºयांसाठी दोन बसेस तर कर्नाटककडे जाणाºया बसेस अक्कलकोटपर्यंत सोडण्यासाठी २ बसेस रवाना करण्यात आल्या. त्यापूर्वी सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशकडे सुमारे ३५० पेक्षा अधिक मजुरांना घेऊन १६ बसेस सोडण्यात आल्या आहेत. या वेळी आ. भरत गोगावले, महाडचे तहसीलदार इंद्रसेन पवार, नायब तहसीलदार प्रदीप कुडाळ आदी उपस्थित होते.

बोर्ली पंचतन येथून तीन बसेस रवाना


बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन, भरडखोल भागामध्ये कर्नाटक राज्यातील अडकलेले ६६ मजुरांना त्यांच्या गावी परतण्यासाठी श्रीवर्धन आगाराच्या तीन एसटी बसेस बुधवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास बोर्ली पंचतन एसटी स्टॅण्ड येथून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जत गावानजीक रवाना झाल्या.
मागील दोन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने प्रवासी वाहतूक करणारी सर्व प्रकारची वाहने बंद आहेत. यामुळे बोर्ली पंचतन परिसरामध्ये तसेच भरडखोल परिसरात रोजीरोटीसाठी आलेले कर्नाटक राज्यातील कामगार अडकून पडले होते. शासनाच्या वतीने अशा ६६ मजुरांची नोंदणी झाल्यानंतर तीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या व एका बसमध्ये २२ प्रवासी असे ६६ प्रवासी घेऊन श्रीवर्धन आगाराच्या तीन बसेस महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील जत गावापर्यंत या ६६ कामगारांना सोडण्यात येणार आहे. या वेळी वाहतूक नियंत्रक प्रसाद मोरे, मंडळ अधिकारी सुनील मोरे, तलाठी नीलेश पवार, सुनील भगत, कोतवाल गणेश महाडीक, पोलीस अधिकारी तानाजी माने, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी वैभव खोत आदी उपस्थित होते.

Web Title: coronavirus: Transport buses ready for Migrant from Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.