चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन साधेपणाने, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 03:06 AM2020-03-21T03:06:38+5:302020-03-21T03:09:58+5:30

चवदार तळे स्मारकाबाहेरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी जमा होण्यास मज्जाव करणारा मोठा फलक नगर परिषदेने लावला होता. तसेच पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.

anniversary of Chavdar Tale Satyagraha, in response to the call of the administration | चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन साधेपणाने, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन साधेपणाने, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद

Next

महाड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले त्या ऐतिहासिक घटनेचा ९३ वा वर्धापन दिन शुक्रवारी अत्यंत साधेपणात साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायांनी उपस्थित न राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार यानिमित्ताने महाडमधील सर्व कार्यक्रम तसेच रिपब्लिकन नेत्यांच्या सभा रद्द करण्यात आल्या. यामुळे शुक्रवारी आंबेडकर अनुयायांनी महाडमध्ये येण्याचे टाळले.

दरवर्षी या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो अनुयायी उपस्थित राहून महामानवाला अभिवादन करतात. यंदा मात्र जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद देत आंबेडकर अनुयायी आज चवदार तळ्याकडे फिरकले नसल्याचे दिसून आले. दरवर्षी २० मार्चला भीमसैनिकांच्या अलोट गर्दीने फुलून जाणारा चवदार तळे परिसर क्रांतिभूमी तसेच महाडमधील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. मात्र प्रातिनिधिक स्वरूपात आमदार भरत गोगावले, महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, नप मुख्याधिकारी जीवन पाटील, तहसीलदार चंद्रसेन पवार आदींनी चवदार तळे आणि क्रांतिस्तंभ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
चवदार तळे स्मारकाबाहेरच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी जमा होण्यास मज्जाव करणारा मोठा फलक नगर परिषदेने लावला होता. तसेच पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता.

नगराध्यक्षांकडून आभार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तसेच महाड नगर परिषदेने केलेल्या आवाहनाला महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायांनी प्रतिसाद देऊन महाडमध्ये होणारी गर्दी टाळली. सहकार्य केले त्याबद्दल नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आंबेडकरी अनुयायांचे विशेष आभार मानले.

Web Title: anniversary of Chavdar Tale Satyagraha, in response to the call of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.