कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 01:37 PM2020-04-07T13:37:30+5:302020-04-07T13:38:32+5:30

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला : तरुणांनी कलागुणांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे

Young people should think positively during the financial crisis created by Corona. | कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा

कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुळे जगभरात संकट निर्माण झाले असून सर्वांच्या पुढे भविष्याची चिंता

अतुल चिंचली - 
पुणे : जगभरात कोरोनाच्या उद्रेकामुळे आर्थिक संकट निर्माण होणार आहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या रोजगारावरही होणार आहे. अशा परिस्थितीत रोजगार मिळवण्यासाठी करिअरच्या उंबरठ्यावर असणारे तरुण चिंताग्रस्त अवस्थेत जाण्याची दाट शक्यता आहे. या वेळी तरुणांनी हतबल न होता आपल्यातील कलागुणांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे, असा सल्ला मानसोपचारतज्ञ व चिकित्सा मानसशास्त्रज्ञांनी तरुणांना दिला आहे.
 कोरोनामुळे जगभरात संकट निर्माण झाले असून सर्वांच्या पुढे भविष्याची चिंता वाढवून ठेवली आहे. तरुण पिढी नेहमी भविष्याचा आधिक विचार करत असते. तरुणांनी नैराश्यात न जाता आशेचा किरण निर्माण होईल, या दृष्टीने विचार करावा. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने यांच्याशी संवाद साधला.
तरुणांमध्ये या कोरोनामुळे एकटेपणा आला आहे. तो एकटेपणा नसून एखादी सुवर्णसंधी समजून स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे चिकित्सा मानसशास्त्रज्ञ अरुंधती खाडिलकर म्हणाल्या. त्यांनी सांगितले, की नोकरीशिवाय स्वत:च्या अंगी असणारे कलागुण, छंद ओळखण्यास सुरुवात करायला हवे. प्रत्येक छंद, कलागुण हा व्यवसाय होऊ शकतो. या दृष्टीने त्याकडे पाहावे. प्रत्येक कंपनीला शून्यातून उभे राहावे लागणार आहे. अशा वेळी कंपन्या कमी पगाराचा नोकरदार वर्ग घेणार. सद्य:स्थितीत कमी पगारावर काम करून एखादा व्यवसाय करणे गरजेचे आहे. कारण सर्व काही सुरळीत होईपर्यंत तरुणांना आर्थिक तडजोड महत्त्वाची आहे. सध्यातरी आशेचा किरण जागृत ठेवावा. ‘मी काही करू शकत नाही, मला मोठ्या पगाराचीच नोकरी पाहिजे, आता बेरोजगारी वाढणार’ या मानसिकतेत बदल करावा.

..............
तरुणांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटवर असे आर्थिक संकट येणे, ही गंभीर बाब आहे. अशा वेळी तरुणांनी हतबल होऊन चालणार नाही. त्यांनी स्वत:च्या कौशल्यविकासाकडे लक्षकेंद्रित केले पाहिजे. या  परिस्थितीत प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करून देणे, हे कुठल्याही कंपनीला शक्य होणार नाही. परिस्थिती सुधारेपर्यंत कौशल्यविकासाचा सकारात्मक दृष्टीने विचार करावा. आपली धकाधकीच्या जीवनात जे ठरवून दिले आहे, तेच काम करण्याची मानसिकता झालेली असते. - अरुंधती खाडिलकर, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ.
................
कोरोनामुळे काही कालावधीनंतर अनेक प्रश्न भेडसवणार आहेत. तरुणांना अशा वेळी करिअरबाबतीत असुरक्षित वाटू शकते. स्पर्धात्मक युगात लवकरात लवकर पैसे कमवून पस्तिशीनंतर आरामशीर जगा, असे त्यांच्या मनात बिंबवले जात आहे. त्यांना पैसा, श्रीमंती अशी स्वप्ने दाखवून कलागुणांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडले जाते. भविष्यात नवीन मार्ग शोधण्याची हीच ती वेळ आहे.- डॉ. मोहन आगाशे, मानसोपचारतज्ज्ञ.
..............
 

Web Title: Young people should think positively during the financial crisis created by Corona.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.