जागतिक चिमणी दिन :  चिमणी अन्न-पाणी, आसऱ्याच्या शोधात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 11:45 AM2020-03-20T11:45:47+5:302020-03-20T11:47:44+5:30

अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने होत आहे कमी

World Sparrow Day: searching of food, water and home by sparrow bird ! | जागतिक चिमणी दिन :  चिमणी अन्न-पाणी, आसऱ्याच्या शोधात!

जागतिक चिमणी दिन :  चिमणी अन्न-पाणी, आसऱ्याच्या शोधात!

googlenewsNext
ठळक मुद्देशहरीकरणाचा बसतोय फटका 

पुणे : माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी म्हणून आपण चिमणीला ओळखतो. पण सध्या शहरात ही चिमणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. या चिमण्यांची संख्या वाढवायची, तर त्यांना आसरा, अन्न, पाणी देणे आवश्यक आहे. 
२० मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जात आहे. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. चिमणी कीटक, धान्य, ज्वारी, तांदूळ, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खाते. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून चिमणी घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधते. 
महात्मा फुले मंडईत चिमण्यांची संख्या बऱ्यापैकी दिसून येते. येथे भाजीपाला विक्रेत्यांच्या आजूबाजूला चिमण्या सतत चिवचिव करतात. परंतु, काही वर्षांपूर्वी दिसणाऱ्या चिमण्यांची संख्याही कमी झाल्याचे येथील विक्रेते सांगतात. याच मंडईतील चिमण्यांची संख्या वाढावी आणि त्यांना आसरा मिळावा म्हणून पक्षिप्रेमी लोकेश बापट यांनी नुकतेच तिथे घरटी बनवून लावली आहेत. तसेच घरटी बांधण्यासाठी जे आवश्यक साहित्य असते, ते देखील तिथे ठेवले आहे. या चिमण्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून मातीची भांडी ठेवली आहेत. 
===================
शहरातील प्रत्येकाने आपल्या घराशेजारी चिमण्यांसाठी आसरा, अन्न आणि पाण्याची सोय करून ठेवली पाहिजे; तरच त्यांची संख्या वाढेल. सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला खूप छान वाटते. त्यामुळे असा आवाज ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. त्यासाठी आम्ही आमच्या घराशेजारीच मातीच्या भांड्यात पाणी आणि सभोवती अन्न ठेवतो. आज चिमण्यांसोबतच अनेक पक्षी येथे येत आहेत. 
- लोकेश बापट, पक्षिप्रेमी 
===========================
गावात वाढ, शहरात कमी 
अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पण गावांत संख्या चांगली आहे. शहरात आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्न न मिळणे, पाणवठे नसणे, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. परंतु, यंदाच्या पक्षीगणनेत तिची वाढ झाल्याचे दिसून आले. पण ही वाढ शहरांमध्ये झालेली नाही. 
============

Web Title: World Sparrow Day: searching of food, water and home by sparrow bird !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.