World obesity Day: Eliminate obesity in childhood | जागतिक लठ्ठपणाविरोधी दिन : मुलांचा लठ्ठपणा बालपणातच दूर करा

जागतिक लठ्ठपणाविरोधी दिन : मुलांचा लठ्ठपणा बालपणातच दूर करा

ठळक मुद्देपिज्झा, बर्गर, तर वडापाव, पॅटिस, सामोसा असे चविष्ट पदार्थ देतात लठ्ठपणाला आमंत्रण

अतुल चिंचली- 
पुणे : देशाचे उज्ज्वल भविष्य असणाऱ्या मुलांमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब, पाठदुखी, मधुमेह असे विकार दिसून येत आहेत. लठ्ठपणामुळे या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लहान असताना मुलांच्या वजनवाढीचा तक्ता तयार करून घेतला. त्या तक्त्याची सातत्याने तपासणी केली तर मुलांचा लठ्ठपणा बालपणातच दूर करता येईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जागतिक लठ्ठपणाविरोधी दिनानिमित्त ' लोकमत ' ने डॉक्टरांशी संवाद साधला. तीस वर्षांपूर्वी भारताची खाद्यसंस्कृती पोषक होती. तसेच कामामध्ये कष्ट असल्याने शरीर सातत्याने हालचाल करत असे. मध्यंतरीच्या काळात देश विकासाच्या मार्गाने धावू लागला. आधुनिक युग सुरू झाले. आधुनिक युगातील तंत्रज्ञानामुळे मानवाच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला. याच आधुनिक युगात भारतीयांनी पाश्चिमात्य खाद्यसंस्कृती स्वीकारली आहे. पावापासून तयार होणारे पदार्थ, पिज्झा, बर्गर, तर वडापाव, पॅटिस, सामोसा असे चविष्ट पदार्थ लठ्ठपणाला आमंत्रण देत आहेत. देशात आता लहान मुलांमध्ये लठ्ठपणा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. ही मुले पुढे जाऊन देशाचे उज्ज्वल भविष्य होणार असतील तर ही गंभीर बाब आहे. 
बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप अलाटे म्हणाले, ‘सध्याची जीवनशैली मुलांच्या लठ्ठपणाला कारणीभूत आहे. चुकीच्या आहारामुळे मुलगा स्थूल होत जातो. लहानपणीचा लठ्ठपणा वयाच्या वीस वर्षांनंतर हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांना आमंत्रण देतो. पालकांनी मुलांना डब्यातही पोळीभाजी, डाळभात असे पदार्थ द्यावेत. मुलांनी वजन कमी करण्यासाठी खाण्याच्या सवयी बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी भाज्या आणि फळे खावीत. त्याचप्रमाणे संपूर्ण धान्य, हरभरे आणि मोडवलेले धान्य यासारखे अन्नपदार्थ खावेत. नियमित अंतरानं थोड्या प्रमाणात अन्न सेवन करावे, तर तळलेले पदार्थ कमी खावेत. शरीराला वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा. मैदानी खेळ मोबाईलवर न खेळता मैदानात जाऊन खेळावेत.
........
लठ्ठपणाची कारणे 
१) व्यायामाचा अभाव, सतत बसून राहणे, तासन्तास टीव्ही पाहणे, संगणकावर गेम खेळणे, मोबाईलचा सातत्याने वापर करणे. 
२) पिज्झा, बर्गर, वेफर्स असे पदार्थ खाणे, मैदा आणि साखर जास्त असणारे पदार्थ खाणे, वेळेवर जेवण न करणे, अतिउष्मांक पदार्थ खाणे. 
३) मैदानी खेळापासून दूर राहणे, कुठल्याही कामाचा आळस करणे. 
४) आईला असलेल्या किंवा गर्भाशयात झालेला मधुमेह यामुळे जन्मत: मुले जास्त वजनाची होऊन लहान वयातच लठ्ठपणा येतो. 
५) मुले सातत्याने मोबाईल आणि टीव्हीसमोर बसून राहतात. हे लठ्ठपणाला आमंत्रण आहे. मुले मोबाईल घेऊन त्यावर पबजीसारखे गेम खेळत बसतात. पालक त्यांना न ओरडता हातातच जेवण आणि जंक फूड दिले जाते. अतिरिक्त प्रमाणात कॅलरीज वाढल्याने लठ्ठपणा वाढत जातो.
.........
सध्याच्या मुलांचा दिनक्रम पूर्णपणे बदलला आहे. दिवसभर शाळा, शिकवणी यामध्ये त्यांचा वेळ जात आहे. त्यामुळे ते मैदानी खेळ खेळत नाहीत. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी फिरायला जाणे पसंत करतात. पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. आपला मुलगा गुटगुटीत आहे, या गोष्टीचा पालकांना खूपच आनंद होतो. पालकांनी मुलांना घरातीलच अन्नपदार्थ खायला दिले पाहिजे. मैदानी खेळ खेळण्यास वेळ दिला पाहिजे. त्यामुळे मुले लठ्ठ होणार नाहीत. - डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ
......
आपली सध्याची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. तीस वर्षांपूर्वीची खाद्यसंस्कृती, जीवनशैली या पद्धतीत आणि आधुनिक युगातील पद्धतीत मोठा फरक जाणवत आहे. पूर्वी कुटुंबातील आजी-आजोबा घरातील लहान मुलांकडे लक्ष देत होते. तेव्हा मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवून मैदानी खेळ खेळायला लावणे, पौष्टिक पदार्थ खायला लावणे, अशा गोष्टी केल्या जात होत्या. पण आता कुटुंब विभक्त झाले आहेत. आईवडील दोघेही नोकरी, व्यवसायात व्यस्त असतात. त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे मुलांच्या जीवनशैलीकडे लक्ष दिले जात नाही. मुलांना पालेभाज्या, डाळी, फळे, फळभाज्या खायला देणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे मैदानी खेळ खेळायला लावले पाहिजेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी शाळेतूनच लठ्ठपणा विषयावर जनजागृती करणे गरजेचे आहे. - डॉ. गिरीश बापट, ओबेसिटी सर्जन, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल.
.........
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: World obesity Day: Eliminate obesity in childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.