महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:40 PM2019-12-17T13:40:16+5:302019-12-17T13:41:51+5:30

१५ दिवसांत ८ गुन्हे : ८ लाखांचा ऐवज लंपास

Women's jewellery gang active on bus trips | महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय

महिलांनो, सावधान! बसप्रवासात दागिने लांबविणारी टोळी सक्रिय

googlenewsNext
ठळक मुद्दे सफाईदारपणे हत्यार चालवून महिलेच्या हातातील बांगडी चक्क कापून चोरून नेतात

पुणे : पीएमपी बसप्रवासात होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांच्या पर्समधील छोटी पर्स चोरून नेणे़, त्यांच्या हातातील बांगड्या सफाईदारपणे भर गर्दीत कापून चोरून नेण्याच्या घटना गेल्या १५ दिवसांत ८ घटना घडल्या आहेत़ या गुन्ह्यांमध्ये किमान ८ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे़ 
पीएमपी बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारून १ लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मोहननगर धनकवडी येथील एका ४३ वर्षांच्या  महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला स्वारगेट ते बालाजीनगर असा पीएमपीने प्रवास करत होत्या. त्या वेळी एक महिला व एक पुरुष  त्यांच्या आजूबाजूला उभे होते. दरम्यान  त्यांनी पर्सची चेन उघडून आतील दागिने असलेली छोटी पर्स काढून घेतली. या पर्समध्ये १ लाख १५ हजार रुपयांचे दागिने होते. 
संबंधित महिला मध्येच बसमधून उतरल्यावर फिर्यादींना चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.  स्वारगेट ते दिवेआगर या एसटी बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी महिलेच्या खांद्यावरील पर्सची चेन उघडून त्यातील छोटी पर्स लांबविली़. त्यात १ लाख २५ हजार रुपयांचे दागिने होते़. ही घटना ३ डिसेंबर रोजी स्वारगेट एसटी बसस्थानकावर घडली होती़.  अशा प्रकारे जेजुरी ते नालासोपारा या बसमध्ये एक महिला इंदापूर येथे बसली़ त्यांच्या पर्सची चैन उघडून चोरट्यांनी ९२ हजारांचे दागिने पळविले.
.....
अशी असते त्यांची ‘मोडस’
* पीएमपी बसला सकाळी व सायंकाळच्या वेळी गर्दी असते़ त्यात लांब अंतरावरच्या बसमध्ये अगदी उभे राहायलाही जागा नसते़. अशावेळी संशयित चोरट्या महिला एखाद्या महिलेला टारगेट करून तिचा पाठलाग करतात. तिघी ते चौघी मिळून तिच्याबरोबर बसमध्ये चढतात. तिच्या पुढे व मागे त्या थांबतात़ काही वेळा त्या एखाद्या पुरुषालाही मदतीला घेतात. त्यांच्याकडील एखादीकडे लहान बाळही असते़ ही महिला जेथे उतरणार असते,त्याच स्टॉपचा त्या तिकीट काढतात. मात्र, गर्दीत त्या या महिलेच्या इतक्या जवळ जातात की त्यांचा धक्का लागला तरी या महिलेला त्याचे काही वाटत नाही़. 
बसमधील इतरांना दिसणार नाही़ अशा पद्धतीने त्यांच्यातील एक चेन उघडते़. शेजारी असणारी दुसरी आत हात घालून त्यातील छोटी पर्स सफाईदारपणे लांबविते़. त्यानंतर त्या ती पर्स पटकन या महिलेपासून लांब असलेल्या तिसरीकडे किंवा त्यांच्या साथीदार पुरुषाकडे पास करतात. त्यानंतर पुढच्या स्टॉपला त्या घाई करत उतरून जातात. मूल कडेवर असल्याने त्या चोरी करतील, असा संशयही बसमधील कोणाला येत नाही़. 
ही महिला बसमधून खाली उतरल्यावर त्यांना आपली पर्सची चेन उघडी असल्याचे लक्षात येते व आत पाहिल्यावर त्यातील छोटी पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येते़. स्वारगेट एसटी बसस्थानकावर अनेकदा महिला चढत असतानाच या संशयित महिला आपल्या हात की सफाई दाखवितात. अशा प्रकारे महिलांच्या हातातील बांगडी चक्क कापून त्या नकळत चोरून नेण्याचे ४ प्रकार शहरात घडले आहेत. अशा प्रकारे गर्दीचा फायदा घेऊन त्या चोरी करताना दिसून येत आहेत.
..........
* हातातील बांगडी नेतात कापून
बसप्रवासात असताना शेजारी थांबलेल्या महिला सफाईदारपणे हत्यार चालवून महिलेच्या हातातील बांगडी चक्क कापून चोरून नेत असल्याचे आढळून आले आहे़. एनडीए ते मनपा बस दरम्यानच्या बसमधून एक महिला प्रवास करीत असताना त्यांच्या हातातून २४ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरट्यांनी कापून नेली़. ही घटना १ डिसेंबर रोजी घडली होती़. 
.........
भोसरी ते पुणे स्टेशन दरम्यान एक महिला बसप्रवास करीत होती़. त्यावेळी गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला चोरट्यांनी त्यांच्या हातातील ४० हजार रुपये किमतीची ३ तोळे वजनाची बांगडी नकळत काढून घेतली़. असाच प्रकार सिटी प्राईड ते अप्पर इंदिरानगर डेपोदरम्यान बसप्रवासात चोरट्यांनी महिलेच्या हातातील ५० हजार रुपयांची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली होती़. भेकराईनगर ते निगडी या बसप्रवासात चोरट्यांनी ७५ हजार रुपयांची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली.  

Web Title: Women's jewellery gang active on bus trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.