कात्रज प्राणिसंग्रहालयाजवळील अतिक्रमणाला पाठबळ कोणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:46 PM2019-11-23T13:46:33+5:302019-11-23T13:47:49+5:30

धनकवडी क्षेत्रीय कार्यालय असूनदेखील अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे या प्रवेशद्वाराचा श्वास गुदमरला...

Who is supporting the katraj encroachment? | कात्रज प्राणिसंग्रहालयाजवळील अतिक्रमणाला पाठबळ कोणाचे?

कात्रज प्राणिसंग्रहालयाजवळील अतिक्रमणाला पाठबळ कोणाचे?

Next
ठळक मुद्देकेवळ ३१ दुकानेच अधिकृत, सध्या दोनशच्या घरात हातगाडीवाले व दुकाने

अभिजित डुंगरवाल-  
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारासमोर हातगाडी व पथारी व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे येथे येणारे पर्यटक त्रस्त झाले आहेत. हाकेच्या अंतरावर धनकवडी क्षेत्रीय कार्यालय असूनदेखील अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे या प्रवेशद्वाराचा श्वास गुदमरला आहे. त्यामुळे या वाढत्या अतिक्रमणामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
१३० एकर जागेत असलेले राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या प्रमुख पाचमध्ये येत आहे. ४२१ वन्य पशू-पक्षी यांचे वास्तव्य व घनदाट वनसंपदेने नटलेले पर्यटनस्थळ म्हणून वर्षभर लाखो पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र प्रवेशद्वाराच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांमुळे गालबोट लागत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. या ठिकाणी पूर्वीचे अधिकृत २१ स्टॉल व नोंदणीकृत ३१ पथारीवाले अशी ५२ संख्या असताना, हातगाडी व पथारीवाले सुमारे दोनशेच्या घरात गेले आहेत. २१ स्टॉलधारकांना पालिकेने  ४ बाय ५ जागा आरक्षित केली असून स्टॉलधारकाकडून महिन्याला फक्त १०० रुपये भाडे आकारले जाते. मात्र येथील स्टॉलधारकांनी आपले परवाने भाड्याने दिले असल्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. तसेच दिलेल्या जागेपेक्षा  पुढे दहा बाय दहा जागेवर मांडव टाकणे, टेबल खुर्च्या टाकून अवैधपणे व्यवसाय करत आहेत.
लगतचे वाहनतळ ते प्रवेशद्वार दरम्यान विकसित केलेला पदपथ हा पूर्णपणे अतिक्रमित झाला आहे. त्यामुळे नागरिकांसह पर्यटकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. तसेच या अतिक्रमणाचा फटका प्राणिसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना सहन करावा लागत आहे. कोट्यधी रुपयांचे उत्पन्न देऊन पर्यटनात नाव उचउंचावणाऱ्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या भविष्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
राजीव गांधी प्राणी संग्रहालय संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनीही वाढत्या अतिक्रमणाबाबत चिंता व्यक्त करत कारवाईबाबत वरिष्ठांना पत्र व्यवहार केला आहे. ही समस्या गंभीर होत असताना केवळ क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग स्तरावर समस्या सुटू शकत नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
........
 परवानाधारकांनी परवाने दिले भाड्याने
याठिकाणी व्यवसाय करणारे नागरिक यांनी पालिकेने दिलेल्या जागेवर अतिक्रमण न करता व ज्याला स्टॉल मिळाला आहे त्यांनीच व्यवसाय करावा. तुमची गरज आहे म्हणून पालिका तुम्हाला येथे स्टॉल दिले आहेत. ते परवाने इतराला भाड्याने देणे ही पालिकेची फसवणूक आहे. अतिक्रमण विभागाने परवाना नसणाऱ्यांना येथून हुसकावून लावले तरच परवानाधारकांचे व्यवसाय व्यवस्थित होतील.

Web Title: Who is supporting the katraj encroachment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.