जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 20:48 IST2025-06-10T20:47:27+5:302025-06-10T20:48:24+5:30

अजित पवार व मी यांच्यात जन्मापासूनचे नाते असून ते त्याच्या जागी आहे, कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत

Whatever happens will be done democratically by asking everyone Supriya Sule's statement on integration | जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान

जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल; सुप्रिया सुळेंचे एकत्रीकरणाबाबत विधान

पुणे : अजित पवार व मी यांच्यात प्रेमाचे पवित्र नाते आहे, कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत, पण राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल, कारण हे राजकारण आहे, भावा-बहिणीचा किंवा भातुकलीचा खेळ नाही, असे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

पक्षाचा २६ वा वर्धापन दिन बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी सकाळी झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू आहे, त्याविषयी भाष्य केले. त्या म्हणाल्या, कोणी कोणाबरोबर जायचे याचा अधिकार राज्यघटनेने सर्वांनाच दिला आहे. अजित पवार व मी यांच्यात जन्मापासूनचे नाते आहे. ते त्याच्या जागी आहे. कुटुंबात आम्ही एकत्रच आहोत, राजकीय निर्णय करायचा तर मात्र सर्वांना विचारूनच करावा लागेल. कारण शरद पवार यांनी आमच्यावर तसेच संस्कार केले आहेत. कधी एकत्र येणार किंवा नाही याला कोणताही कालमर्यादा नाही. ऑपरेशन सिंदूर सुरू होते त्यावेळी आम्ही सरकारवर कसलीही टीका केली नाही. आता ते संपले आहे. राष्ट्रीय आघाडी म्हणून आम्ही आता या विषयावर संसदेचे स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे, असे खासदार सुळे म्हणाल्या.

 शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका मुलाखतीत सुप्रिया सुळे आणि इतर नेते याबाबत निर्णय घेतील अशा स्वरूपाचं विधान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे एकत्रीकरणाबाबत विधान केलंय. जे होईल ते लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारूनच होईल. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्या मनात जो निर्णय असेल त्यानुसार पक्ष निर्णय घेणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळेंच्या एका विधानानं आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू होणार का? असे तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Web Title: Whatever happens will be done democratically by asking everyone Supriya Sule's statement on integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.