बहिणीच्या बाळंतपणासाठी गावावरून येत होती; पीएमपीच्या धडकेत एकीचा मृत्यू, गर्भवती गंभीर जखमी, तळवडे - निगडी रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:28 IST2025-12-09T17:28:20+5:302025-12-09T17:28:49+5:30
अपघातातील दोन्ही महिला सख्या बहिणी असल्याचे समोर आले आहे. राधा ही गर्भवती असल्याने तिच्या बाळंतपणासाठी छोट्या बहिणीला गावाहून बोलावण्यात आले होते.

बहिणीच्या बाळंतपणासाठी गावावरून येत होती; पीएमपीच्या धडकेत एकीचा मृत्यू, गर्भवती गंभीर जखमी, तळवडे - निगडी रस्त्यावरील घटना
पिंपरी/चिखली : पीएमपीएमएलच्या भरधाव ई-बसने धडक दिल्याने नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तसेच एक महिला गंभीर जखमी झाली. तळवडे येथे तळवडे–निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळ मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
सुधा बिहारीलाल वर्मा (वय ९, रा. उत्तरप्रदेश), असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. राधा राम मनोज वर्मा (वय २२, सध्या रा. साई गार्डनजवळ, तळवडे; मूळ रा. उत्तरप्रदेश), असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) एमएच १२ एसएफ ४४०३ (मार्ग क्र. ३६९) या क्रमांकाच्या ई-बसचा चालक किरण भटू पाटील (वय ३५, रा. टावर लाईन, चिखली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा आणि तिचा पती राम वर्मा हे दोघेही तळवडे येथील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. राधा गरोदर असल्याने तिने मदतीसाठी दोन महिन्यांपूर्वी तिची लहान बहीण सुधा हिला गावाकडून बोलावून घेतले. राधा हिचा भाऊ देखील त्यांच्यासोबत राहण्यास असून तो एका खासगी कंपनीत कामाला आहे.
दरम्यान, सोमवारी (दि. ८ डिसेंबर) रात्रपाळी करून आल्यानंतर राम वर्मा मंगळवारी घरी झोपला होता. तर त्याची पत्नी राधा ही कामावर गेली होती. दुपारी एकच्या सुमारास राधा घरी आली. जेवण करून सुधा हिला सोबत घेऊन राधा पायी चालत कंपनीत परत कामावर जात होती. त्यावेळी रस्ता ओलांडत असताना भरधाव पीएमपीएमएल बसने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने सुधा हिचा मृत्यू झाला. तर राधा गंभीर जखमी झाली. राधा हिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताबाबत माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बस चालक किरण पाटील याला ताब्यात घेतले.
संतप्त नागरिकांकडून बसची तोडफोड
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच संतप्त जमावाकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र देहूरोड पोलिसांनी नागरिकांशी संवाद साधून जमावाला शांत केले. तसेच वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
काही काळासाठी बस वाहतूक बंद
बसची तोडफोड झाल्यानंतर काही काळ तळवडे–निगडी मार्गावरील बस सेवा थांबवण्यात आली. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. विशेषतः महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास झाला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बस वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. अपघातग्रस्त बस देहुरोड पोलिस ठाण्यात नेण्यात आली. तसेच पीएमपीएमएल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
‘‘अपघात थांबणार कधी?’’
हिंजवडी येथे १ डिसेंबर रोजी खासगी बसने चिरडल्याने तीन भावंडांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ तळवडे येथे पीएमपीएमएल बसने धडक दिल्याने नऊ वर्षीय चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. अपघातांची ही मालिका कधी थांबणार, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.
‘‘प्रशासकीय यंत्रणा गंभीर नाहीत’’
बस चालकांकडून वेगमर्यादा व वाहतूक नियमांचे पालन होत नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. या बाबतीत पीएमपीएमएल, पोलिस, महापालिका आणि इतर प्रशासकीय यंत्रणा गंभीर नाहीत, असाही आरोप नागरिकांनी केला.