लसीकरणाचा फक्त गाजावाजा; पुण्यात सावळा गोंधळ, नागरिकांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 02:37 PM2021-03-01T14:37:25+5:302021-03-01T15:01:14+5:30

या लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यासाठी ८ मार्च उजाडण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

The vaccination only on paper ; confusion in the system and time to return empty handed to the citizens in the pune | लसीकरणाचा फक्त गाजावाजा; पुण्यात सावळा गोंधळ, नागरिकांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ

लसीकरणाचा फक्त गाजावाजा; पुण्यात सावळा गोंधळ, नागरिकांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ

Next

पुणे: कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी पुण्यामध्ये गोंधळ उडलेला बघायला मिळाला. कोरोना लसीकरण करण्यात येणार असं वाटून अनेक‌ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली . मात्र यंत्रणांची तयारी नसल्याने लसीकरण व नोंदणी होणार नसल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. यानंतर काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग हे उद्भवलेले पाहायला मिळाले. दरम्यान या लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यासाठी ८ मार्च उजाडण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या वतीने लसीकरण याचा तिसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु होईल असे जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यात साठ वर्षांच्या वरील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. सरकारने केलेल्या घोषणेनंतर आणि त्यातच आज पंतप्रधान मोदींच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आजपासून लसीकरण सुरू होत आहे असे समजून अनेक नागरिकांनी पुण्यातील चारही लसीकरण केंद्रांवर गर्दी केली. आमची नोंदणी करून द्या, तसेच आमचे लसीकरण करा अशी मागणी करत हे नागरिक या केंद्रांवर दाखल झाले. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाची अजूनही तयारी झालेली नाही. मुळात यासाठीची सूचना देखील राज्य सरकारकडून येणे बाकी आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी या सगळ्या नागरिकांना परत पाठवण्याची वेळ महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आली. सरकारने जाहीर केलेले असताना ना तुम्ही आम्हाला परत कसे पाठवता असे म्हणत काही ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले. पण काही सूचना नसल्याने आपण काहीच करू शकत नाही असे सांग लसीकरण केंद्रावरील अधिकाऱ्यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या कोविन ॲप अपडेटनंतरही त्यातील तांत्रिक अडचणी संपायला तयार नसल्याचे समोर आले आहे. या ॲपमध्ये लोकांची नोंदणी करायचा प्रयत्न करताना कधी लॉगिनला अडचणी तर कधी आज पण सुरू होईल ना अशा या अडचणींचा सामना देखील प्रशासनाला करावा लागला. 

त्यातच या लसीकरणात ॲपमध्ये नागरिकांना कोणती लस घ्यायची याचा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे मात्र शहर प्रशासनाकडे कोविशिल्ड तर जिल्हा प्रशासनाकडे को- व्हॅक्सिन ही लस उपलब्ध असल्यामुळे हा पर्याय नेमका कसा उपलब्ध करून द्यायचा याबद्दल संभ्रम असल्याचे देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नागरिकांची सोशल मीडियावर जाहीर नाराजी....

अनेक नागरिकांनी थेट सोशल मीडियावरही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दवाखान्याबाहेर उभे राहुन देखील लसीकरण करता येणार नाही तसेच ॲप चालत नाही असा दावा करत परत पाठवले गेल्याचे नागरिकांनी सांगितले. 

लसीकरण केंद्राचे पत्तेच चुकीचे...

याबरोबरच लसीकरणासाठी ॲपवर खूप कमी स्लॅाट उपलब्ध आहेत. तसेच लसीकरण दिलेले केंद्रांचे पत्ते देखील योग्य नसल्याची तक्रार नागरिकांनी नोंदवली.

Web Title: The vaccination only on paper ; confusion in the system and time to return empty handed to the citizens in the pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.