कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्हावा ‘इंटिलिजंट’ वापर- नंदन नीलेकणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:46 AM2019-02-02T02:46:59+5:302019-02-02T02:47:21+5:30

एचके फिरोदिया फाउंडेशनतर्फे पुरस्कार वितरण

The use of artificial intelligence 'intelligent' - Nandan Nilekani | कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्हावा ‘इंटिलिजंट’ वापर- नंदन नीलेकणी

कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्हावा ‘इंटिलिजंट’ वापर- नंदन नीलेकणी

googlenewsNext

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगारनिर्मितीवर विपरीत परिणाम होत आहे. स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मकतेने वापर व्हायला हवा. छोट्या कंपन्या, लघुद्योजक एकत्र येऊन रोजगारनिर्मितीला हातभार लावू शकतात आणि तरुणांचे भवितव्य उज्ज्वल राहू शकते, असा आशावाद इन्फोसिसचे सहसंस्थापक डॉ. नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केला.

एचके फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे टीआयएफआरचे संचालक प्रा. संदीप त्रिवेदी यांना विज्ञानरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस अँड इन्स्टेमचे संचालक प्रा. सत्यजित मेयर यांना विज्ञानभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि संचालक नंदन नीलेकणी यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला. नीलेकणी यांना जीवनगौैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोविंद स्वरूप, डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया उपस्थित होते.

माशेलकर म्हणाले, ‘‘स्पर्धेच्या युगात अडथळे आले तरी ते पार करण्याची तयारी, मेहनत, जिद्द असायला हवी. झटपट यशाला काहीच महत्त्व नसते. प्रयत्नांमध्ये सातत्य असायला हवे. भारतात तंत्रज्ञान युगात क्रांती घडत आहे. करिअरच्या संधी इतर देशांपेक्षा भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तरुणांनी आपल्या क्षमतेचा, हुशारीचा वापर करून उज्ज्वल भविष्यासाठी झटायला हवे.’’ प्रा. संदीप त्रिवेदी म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट सखोल पद्धतीने जाणून घ्यायला हवी, हे वडिलांनी शिकविले. क्वाँटम फिजिक्स हा क्लिष्ट विषय असला तरी त्या क्षेत्रात तरुणांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तरुणांनी स्वत:च्या आणि देशाच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे.’’

सत्यजित मेयर म्हणाले, ‘‘जीवशास्त्र हे या शतकाचे विज्ञान आहे. जीवनाचे विविध टप्पे आपण कशा प्रकारे जाणून घेतो, यावर आपले भविष्य अवलंबून आहे. या क्षेत्रात तरुणांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जिनोमचे स्वरूप समजून घेण्यासाठी मोठ्या माहितीचा खजिना आपल्याकडे उपलब्ध झाला आहे. त्याचा वापर आपण कसा करतो, यावर भविष्यातील यशापयश अवलंबून आहे. सध्याच्या काळात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणिताचा उपयोग करून जीवशास्त्र नेमकेपणाने समजून घेता येते. स्टेम सेल तंत्रज्ञान सध्याच्या काळात खूप चर्चिले जात आहे. यामध्ये संशोधनाला व्यापक वाव आहे.’’

Web Title: The use of artificial intelligence 'intelligent' - Nandan Nilekani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.