'Trolley Robot' is create for Corona Ward by Ninth class Student 'Idea' | नववीतील विद्यार्थ्याची ‘आयडिया’ कमाल, कोरोना वॉर्डसाठी बनविला ‘ट्रॉली रोबोट’ धम्माल

नववीतील विद्यार्थ्याची ‘आयडिया’ कमाल, कोरोना वॉर्डसाठी बनविला ‘ट्रॉली रोबोट’ धम्माल

ठळक मुद्देपालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाला दिला भेटहा वॉर बॉट मोबाईलच्या सहाय्याने रिमोटप्रमाणे ऑपरेट करता येऊ शकणार या रोबोटमुळे रुग्णांना जेवण, डबे, औषधे, पाणी, आवश्यक साहित्य जागेवर पोचविणे सुकर होणार

लक्ष्मण मोरे -

पुणे : कोरोनाशी लढताना डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, पालिका अधिकारी-कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याच्या आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांनी व्यथित झालेल्या एका विद्यार्थ्याने स्वत:ची कल्पकता लढवित रोबोटिक कोविड १९ वॉर बॉट (ट्रॉली) तयार केली आहे. ही रोबोट ट्रॉली महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयाला भेट देण्यात आली. ‘कोरोना वॉरियर्स ’ बाबत त्याने दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.
विराज राहुल शहा (वय 15) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. विराज हा लष्कर परिसरातील दस्तूर विद्यालयामध्ये नववीमध्ये शिकतो आहे. त्याला रोबोट तयार करणे, कोडींग आणि स्पेस सायन्सची आवड आहे. त्याने यापूर्वी पुणे ते पालिताना हे ९०० किलोमीटरचे अंतर सायकलवरुन आठ दिवसात पूर्ण केले होते. त्यासाठी पालिकेने त्याला ‘प्राईड ऑफ पुणे’ गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता फैलाव आणि वाढत चाललेली रुग्ण संख्या, रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आदी 'कोरोना वॉरियर्स' कडून अहोरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा सुरु आहे.

रुग्णांना औषधे, चहा, नाश्ता, जेवण आणि आवश्यक साहित्य देण्याकरिता रुग्णाच्या वॉर्डात जावे लागते. त्यासाठी पीपीई कीट घालावे लागते. हे कीट सहा तास काढता येत नाही. त्या काळात काही खाता येत नाही की नैसर्गिक विधीही करता येत नाहीत.
हा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार विराजच्या मनात सुरु होता. इंटरनेटचा वापर आणि त्याची आवड याची सांगड घालत त्याने रोबोटची प्रतिकृती तयार करण्याचा विचार केला. अभियांत्रिकीचे कोणतेही ज्ञान नसतानाही त्याने धडपड करीत रोबोट विकसित केला. त्याला करण अजित शहा (वय 19) आणि दीप विवेक सेठ (वय 19) या दोन संगणक अभियंता मित्रांनी मदत केली. सलग 40 दिवस सातत्याने काम करुन त्याने हा रोबोट विकसित केला. लॉकडाऊन असल्याने आवश्यक साहित्य मिळण्यात अडचणी येत होत्या. मिळेल तसे साहित्याची जमवाजमव करीत त्याने या ट्रॉलीची निर्मिती केली. हा रोबोट रुग्णालयाला भेट देण्यात आला. यावेळी सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे, अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते, संदीप नरेंद्र शहा, राहूल दीपक शहा, करण अजित शहा, दीप विवेक सेठ उपस्थित होते.

======
रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून मुलांनी दिवसरात्र मेहनत करुन ही ट्रॉली तयार केली आहे. सेवा देत असताना रोबोटमधील आढळून येणा-या त्रूटी दूर केल्या जातील. विराजला अभियांत्रिकीचे कोणतेही ज्ञान नसताना केवळ कृतज्ञतेच्या भावनेतून त्याने ही निर्मिती केली आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.
- राहुल शहा (वडील), संदीप शहा
=======

काय आहेत वैशिष्ट्ये .. 
हा रोबोट स्वयंपूर्ण आणि वापरासाठी एकदम सोपा आहे. यामध्ये तीन कंपार्टमेंट्स आहेत. हे विलग करता येतात. हे कंपार्टमेंट्स स्वच्छ करता येऊ शकतात. हा वॉर बॉट मोबाईलच्या सहाय्याने रिमोटप्रमाणे ऑपरेट करता येऊ शकणार आहे. यामध्ये कॅमेरा आणि थर्मामीटरचीही व्यवस्था केली जाणार आहे. या रोबोटमुळे रुग्णांना जेवण, डबे, औषधे, पाणी, आवश्यक साहित्य जागेवर पोचविणे सुकर होणार असल्याने कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Trolley Robot' is create for Corona Ward by Ninth class Student 'Idea'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.