विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल; जयंत पाटलांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:31 IST2025-12-09T19:30:41+5:302025-12-09T19:31:02+5:30
विरोधी पक्षनेत्याची निवड होणे गरजेचे असताना निवड झाली नाही, तशी हालचालही दिसत नाही

विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल; जयंत पाटलांची टीका
पुणे : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी (दि. ८) विरोधी पक्षनेत्याची निवड होणे गरजेचे होते. मात्र, निवड झाली नाही. तशी हालचाल दिसत नाही. सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, असे दिसते. कदाचित विरोधी पक्षनेता नसल्याने सरकारला बरे वाटत असेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. हिवाळी अधिवेशात विदर्भातील जनतेचे प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित आहे. मात्र, या अधिवेशनात विदर्भाला न्याय दिला जात नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होत आहे. या मुद्द्याला धरून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही, असे दिसते, असे मत व्यक्त केले.
नाशिक येथील तपोवन येथील वृक्षतोडीबाबत विचारले असता ते म्हणाले, कुंभमेळ्याला विरोध नाही. पण, झाडे तोडणे योग्य नाही. नाशिककर हे मोडून काढतील. मुंढवा जमीन घोटाळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले, समिती नेमली आहे. त्याचे निष्कर्ष आल्यावर बोलणे योग्य राहील.