टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 08:05 AM2021-01-03T08:05:54+5:302021-01-03T08:10:02+5:30

जाहिरातीत आकर्षक ऑफरवर शेवटी ‘टर्म्स ॲंड कंडिशन्स अप्लाय’ असा इशारा असतो.....

Terms and Conditions Apply! | टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय! 

टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय! 

Next

जाहिरातीत आकर्षक ऑफरवर एक छाेटा स्टार असतो आणि तळात त्या स्टारपुढे ‘टर्म्स ॲंड कंडिशन्स अप्लाय’ असा इशारा असतो. अगदी तसंच 2021 मध्ये दैनंदिन जीवनात ‘टर्म्स ॲंड कंडिशन्स अप्लाय’ची अदृश्य तळटीप असेल अन् त्याचं भान आपल्याला राखावं लागेल. त्याविषयी...

नवा सूर्य अन् नवे जग
जुनाच दाह, जुनीच धग
नववर्षाचा वाहतोय वारा
नव्या 'ऑफर'वर छोटा तारा
तार्‍याखाली लिहिलं काय

 * टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

मागील वर्षाचा नवा मंत्र
‘न्यू नॉर्मल’चे नवे तंत्र
थर्मल गनने हळदी-कुंकू
सॅनेटायझर तीर्थ शिंपडू
नात्यांना कनेक्ट वाय फाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

माणसे-वाहने, नो डिफरन्स
‘ऑल्वेज कीप सेफ डिस्टन्स’  
शिक्षणच अवघे  ‘ऑनलाईन’
प्रेमातही आता लक्ष्मण ‘लाईन’
नकोशा क्राऊडला गुड बाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

लग्नातही विसरा भावकी
अवघी ‘लिमिटेड माणूसकी’
कोविड विघ्नास  नको आमंत्रण
पन्नास जणांनाच द्या निमंत्रण
वर-वधू पक्षांचा निरूपाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!
मास्कमागून जिवाचा गुदमर
चिमटा घेतोय ‘ऑक्सिमीटर’
वेदना चेहऱ्यावर येत आहे
मुखवट्यांमागे अविरत वाहे
लसीकरण जरी असे उपाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

जगणं  ‘अनलॉक’  होत आहे
‘लॉकडाऊन’  विसरू पाहे
व्हायचं नसेल ‘क्वारंटाईन’
सृष्टीलाच करा ‘व्हॅलेंटाईन’
वेळ लागेल, येईल रिप्लाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

नव्या दशकाची आहे नांदी
जुन्या अनुभवांतून घेऊ नोंदी
विसरू चंगळ, राखू भान
मार्केटने जरी उठवले रान
जशी मागणी, तसा सप्लाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

दिवसांमागून दिवस जातील
रात्रींमागून रात्रीही जातील
ऋतूही त्यास अपवाद नाही
नक्षत्रही कधी थांबत नाही
उत्पत्ती, लयीचे चक्र महाकाय

* टर्म्स् अँड कंडिशन्स अप्लाय!

- अभय नरहर जोशी -

(लेखक ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)
--
 

Web Title: Terms and Conditions Apply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.