शिक्षक दिन : शिक्षकांमुळे मॉनिटर ते कुलगुरूंपर्यंतच्या प्रवासाला दिशा : डॉ. नितीन करमळकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:28 PM2019-09-05T12:28:20+5:302019-09-05T12:28:33+5:30

विद्यार्थी घडवणे म्हणजे समाज घडवणे आणि समाज घडवणे म्हणजे देश घडविणे आहे. हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे.

Teacher's Day: Direction from teacher to Monitor to Vice Chancellor: Dr. Nitin Karamalkar | शिक्षक दिन : शिक्षकांमुळे मॉनिटर ते कुलगुरूंपर्यंतच्या प्रवासाला दिशा : डॉ. नितीन करमळकर 

शिक्षक दिन : शिक्षकांमुळे मॉनिटर ते कुलगुरूंपर्यंतच्या प्रवासाला दिशा : डॉ. नितीन करमळकर 

googlenewsNext
ठळक मुद्देमिळाले सतत प्रोत्साहन : कलाशाखेत होता रस; परंतु वळलो विज्ञान शाखेकडे

पुणे : शालेय जीवनात मराठी, संस्कृत भाषेच्या शिक्षकांमुळे मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची गोडी लागली. कोल्हापूरच्या न्यू हायस्कूल शाळेचे सातवीपासून वक्तृत्व स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले. वर्गातील चुणचुणीत मुलगा असल्याने वर्गात माझी नेहमी मॉनिटर म्हणून निवड होत असे. शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे शालेय जीवनात नाटक, वक्तृत्व, हस्ताक्षर स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत होतो. सुरुवातीला माझा कला शाखेकडे अधिक कल होता. परंतु, पुढे मी विज्ञान शाखेकडे वळालो. माझे गुरू ए. जी. देसाई आणि जिओलॉजी विभागाचे प्रमुख के. बी. पवार यांच्यामुळे मी खऱ्या अर्थाने शिक्षणक्षेत्रात आलो आणि वर्गातील मॉनिटरपासून सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या कुलगुरूपदापर्यंतचा प्रवास करू शकलो, अशा भावना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
.....
शालेय जीवनात मराठी विषयाचे मुनीश्वर सर, कला व संस्कृत विषयाचे बीडकर सर, इंग्रजीचे दीक्षित सर आणि शिंदे सर या शिक्षकांची नावे माझ्या लक्षात राहतात. मला भाषेची खूप आवड होती. कोल्हापूर ही तशी कलानगरी. भालजी पेंढारकरांच्या जयप्रकाश स्टुटिओमध्ये जाणे होत असल्याने अभिनेता, लेखकांचे बोलणे कानांवर पडत होते. साहित्यिक वि. स. खांडेकरांचा बंगला आमच्या घराच्या परिसरात होता. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रात काही करावे, असे मला वाटत होते. परंतु, बदलता टेÑण्ड पाहून मी विज्ञान शाखेकडे वळलो.
......
शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याचे त्याच्या आयुष्यातील उत्कृष्ट काम करत असतो. विद्यार्थी घडविण्यासाठी पॅशन आणि पेशन्स असावे लागतात.  माझ्या शिक्षकांमुळे मी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत आलो. विद्यार्थी घडवणे म्हणजे समाज घडवणे आणि समाज घडवणे म्हणजे देश घडविणे आहे. हे शिक्षकांनी लक्षात घेतले पाहिजे. शिक्षकी पेशाकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता समाज निर्माण करण्याच्या कार्यातील एक स्वयंसेवक म्हणून आपण कार्यरत असले पाहिजे. ही मनुष्य घडविण्याची प्रक्रिया आहे. ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याची जाण ठेवून प्रत्येक शिक्षकाने काम केले पाहिजे, असेही करमळकर यांनी सांगितले. 
......
दहावीपर्यंत चप्पल नाही 
सर्वसामान्य कुटुंबातून आलो. त्यामुळे सर्वांना ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्याच माझ्या वाट्याला आल्या. त्यात दहावीपर्यंत पायात चप्पल नसणे, सर्वांत धाकटा असल्यामुळे थोरल्या भावाची कपडे घालणे, जुनी पुस्तक वापरणे. आई-वडिलांनी मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला लावला. त्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राची ओळख झाली. माझ्या घडणीत शिक्षकांबरोबच आई-वडलांचाही मोठा वाटा आहे.
......
कुलगुरुपदाचा आनंद 
आपला विद्यार्थी शिक्षक झाला आणि त्यानंतर कुलगुरूपदापर्यंत पोहोचला, याचा माझे शिक्षक ए. जी. देसाई आणि के. बी. पवार यांचा उर भरून आला. कुलगुरुपदी निवड झाल्यावर देसाई सर, पवार सर आणि व्ही. व्ही. पेशवा सर यांनी समाधान व्यक्त करून स्वत:ला झालेला आनंद बोलून दाखवला.
.......
माझ्या जेवणासोबतच पीएचडीची फीसुद्धा शिक्षकांनी भरली
माझे गुरू ए. जी. देसाई आणि विद्यापीठातील जिओलॉजी विभागाचे प्रमुख के. बी. पवार यांनी मला खºया अर्थाने दगडाशी बोलायला शिकवले. दगडाच्या तोंडून त्याचा इतिहास समजून घेण्याची कला याच शिक्षकांमुळे मला अवगत झाली. पीएच.डी. करताना काही कारणांमुळे माझी शिष्यवृत्ती बंद झाली होती. त्या वेळी माझ्या जेवणाच्या व्यवस्थेसह पीएच.डी.चे शुल्क भरण्यापर्यंत सर्व काही शिक्षकांनीच केले. एक प्रकारे गुरूकुल पद्धतीत मी शिक्षण घेतले.

Web Title: Teacher's Day: Direction from teacher to Monitor to Vice Chancellor: Dr. Nitin Karamalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.