बारामतीत सुप्रिया सुळेंची विजयाची हॅट्रिक.. !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:48 PM2019-05-23T22:48:45+5:302019-05-23T22:53:01+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या सुरुवातीलाच ,दादा, बिटीया गिरनी चाहिए अशी सूचना केली होती

Supriya sule victory hat-trick in Baramati..! | बारामतीत सुप्रिया सुळेंची विजयाची हॅट्रिक.. !

बारामतीत सुप्रिया सुळेंची विजयाची हॅट्रिक.. !

Next

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाजप उमेदवार कांचन कुल यांच्याविरोधात १ लाख ५४, ९९४ चे मताधिक्य मिळवून विजयाची  हॅट्ट्रिक साधली. पवार कुटुंबीयांच्याच नातेवाईक असलेल्या तसेच रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुरुवातीपासूनच सुळे यांच्यासमोर त्यांना तगडे आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ६, ८६,७१४ तर कांचन कुल यांना ५, ३०,९४० मते पडली. सुळे यांनी १,५५,९४० मतांनी विजय प्राप्त केला.  
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या सुरुवातीलाच ,दादा, बिटीया गिरनी चाहिए अशी सूचना केली होती. त्यासाठी मंत्री पाटील बारामतीमध्ये तळ ठोकून होते. शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भाजपच्या सर्व रथी-महारथींनी कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचे चित्र निर्माण करण्यास भाजप यशस्वीदेखील झाली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देशात भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी पुढाकार घेतल्याने  बारामती लोकसभा मतदारसंघातच पवार यांना विरोध करण्यासाठी भाजपने  मोठी  राजकीय व्यूहरचना  आखली होती.
 भाजपच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातल्याने यंदा यंदा प्रथमच बारामतीत राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. गेल्या ५५ ते ६० वर्षांपासून या मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या  पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या भागात सभा घेऊन पाणी प्रश्नावर परिवर्तन करा, तुमचा प्रश्न सोडवितो, असे खुले आव्हान दिले होते. 
२०१४ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे  यांचा केवळ  ६७ हजार ७१९ मतांनी विजय झाला होता. सुळे यांनी पाच लाख ६९ हजार ८२८ मते, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी चार लाख ५२ हजार ५३१ मते घेतली. तर आपच्या सुरेश खोपडे यांनी २६ हजार ४६२ मते घेतली. अचानक उमेदवारी मिळवून जानकर यांनी दिलेली लढत असूनही त्यांना मिळालेली मते चर्चेचा विषय ठरली होती. यंदा ऐनवेळी जानकर यांच्या पक्षातील आमदाराच्या पत्नीलाच कमळ चिन्हावर भाजपने उमेदवारी दिली. मात्र,भाजपचा घटक पक्ष असणाºया रासपच्या प्रमुखाने  २०१४ मध्ये पक्षाच्या चिन्हावर दिलेली लढत यंदाच्या लढतीच्या तुलनेने उजवी ठरली.  २०१४ मध्ये  सुप्रिया सुळे  यांना जानकर यांच्याविरोधात केवळ  ६७ हजार ७१९ मताधिक्य मिळाले होते. यंदा कुल यांच्याविरोधात १ लाख ५४ हजार ९९४ चे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे जानकर यांची त्या वेळची लढत तुलनेने अधिक कडवी होती, हे स्पष्ट होते.
 २०१४ च्या निवडणुकीत घटलेल्या मोठ्या मताधिक्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी यंदा चांगलीच दक्षता घेतल्याचे या वेळी दिसून आले. लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये जनसंपर्क ठेवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच  भर दिला. मतदारसंघातील  समस्या, लोकांचे प्रश्न सोडवून देण्यावर त्यांचा विशेष भर होता. बारामती भागात दुष्काळी दौºयांच्या माध्यमातून जनसंपर्क कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. इंदापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लक्ष घातले. सोशल मीडियाच्या माध्यमाचा  सुळे यांनी सर्वाधिक प्रभावी वापर करीत तरुणाईशी संवाद साधलेला संवाद त्यांच्यासाठी ह्यप्लस पॉर्इंटह्ण ठरला. सोशल मीडियावर मतदारसंघातील विविध प्रश्नांसह महत्वाच्या प्रश्नांवर सुळे यांनी  कमालीची  आक्रमकता दाखविली. गेली पाच वर्षे लोकसभा मतदारसंघ विविध कार्यक्रम व उपक्रमांनिमित्त पिंजून काढला. संसदेतील उपस्थिती, उपस्थित केलेले प्रश्न आणि सलगपणे मिळालेल्या उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारामुळे लोकसभेतही त्यांनी खासदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला. महाविद्यालयीन तरुणांमध्ये पोहोचण्यासाठीही त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले होते. त्याचाही त्यांना फायदा झाला.  भाजपने  मराठा समाजाला आरक्षण  देऊन खूष करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जीएसटी, नोटाबंदी, धनगर समाजाचे आरक्षण, शेतमालाचे अडचणीतआलेले बाजारभाव, कर्जमाफी, बारामतीच्या जिरायती भागातील पाणीप्रश्न  या बाबी निवडणुकीत अधिक महत्त्वाच्या ठरल्या. 
--
जनसंपर्क नसल्याचा कुल यांना फटका...
 याउलट कांचन कुल यांचा दौंड मतदारसंघ वगळता  इतर ठिकाणी अपेक्षित जनसंपर्क नव्हता. त्याचा त्यांना फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला, ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांचा प्रभाव असणारा परिसर म्हणून बारामतीची ओळख आहे. बारामती नगर परिषदेसह तालुक्यातील माळेगाव कारखाना वगळता सहकारी संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आहे. देशहितासाठी मोदींची गरज आणि जिरायती भागातील पाणी प्रश्न सोडविण्यात राष्ट्रवादीचे अपयश हे दोन मुद्दे वगळता भाजपकडे प्रचाराचे प्रभावी मुद्दे नव्हते. भाजपच्या उमेदवाराचे माहेर बारामती असले तरी त्या आता दौंडच्या सूनबाई आहेत. त्यामुळे तुलनेने बारामतीच्या मतदारांचा जनसंपर्क भाजपच्या उमेदवारांना नवखा असल्याचा फटका बसला.  
——————————————————
की फॅक्टर
१) पाच वर्षांपासून मतदारसंघातील सर्वसामान्यांशी ठेवलेल्या संपर्काचे मतदानात झाले रूपांतर, मतदानाची टक्केवारी वाढल्याचाही झाला फायदा.
२) मोदींच्या न झालेली सभेने मतदारांमध्ये संभ्रम, मोदी लाट ओसरल्याच्या वावड्यांनी फिरले मतदान.

Web Title: Supriya sule victory hat-trick in Baramati..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.