विद्यार्थ्यांकडून ‘पीएमपी’ला रामराम : पासची संख्या रोडावतेय 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 07:00 AM2019-10-19T07:00:00+5:302019-10-19T07:00:02+5:30

बसला पर्याय म्हणून स्कुल बस, व्हॅन, रिक्षा तसेच खासगी वाहनांचा वापर वाढल्याचे दिसत आहे...

students stop the journey by ' PMP bus : The number of passes is decreased | विद्यार्थ्यांकडून ‘पीएमपी’ला रामराम : पासची संख्या रोडावतेय 

विद्यार्थ्यांकडून ‘पीएमपी’ला रामराम : पासची संख्या रोडावतेय 

googlenewsNext
ठळक मुद्देस्कुल बस, व्हॅन, खासगी वाहनांचा वापर वाढला दुसरीकडे ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होत आहे कमी२०१५ यावर्षी ऑगस्ट महिन्यात एकूण विद्यार्थी पासची संख्या सुमारे ७० हजार एवढी ठराविक मार्गासाठी सप्टेबर व ऑक्टोबर २०१७ मध्ये असलेल्या पासही त्यांनी केला होता बंद मागील काही वर्षांत पीएमपीला पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालल्याचे चित्र

पुणे : खिळखिळ्या बस, वाढते ब्रेकडाऊन, वेळेतील अनियमितता, अपघाताचे प्रमाण यामुळे मागील काही वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)च्या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे. बसला पर्याय म्हणून स्कुल बस, व्हॅन, रिक्षा तसेच खासगी वाहनांचा वापर वाढल्याचे दिसत आहे. 
शहर व लगतच्या परिसरात शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाच्या अनेक सुविधा निर्माण होत आहेत. नवनवीन शैक्षणिक संस्थांची भर पडत आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढाही वाढला आहे. एकीकडे विद्यार्थी संख्येत प्रचंड वाढ होत असताना दुसरीकडे ‘पीएमपी’ने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात पास दिले जातात. महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पास दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या पासचे पैसे दोन्ही महापालिकांकडून पीएमपीला मिळतात. तर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना पास रकमेत २५ टक्के तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे सुरूवातीपासून या योजनेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण मागील काही वर्षांत पीएमपीला पसंती देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत चालल्याचे चित्र आहे. 
‘पीएमपी’ प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१५ यावर्षी ऑगस्ट महिन्यात एकूण विद्यार्थी पासची संख्या सुमारे ७० हजार एवढी होती. पण यावर्षी हा आकडा तब्बल ३० हजाराने कमी झाला आहे. मागील पाच वर्षात पासच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पास सुसूत्रीकरणामध्ये महापालिका क्षेत्रासाठी असलेला ६०० रुपयांचा मासिक पास बंद करून केवळ ७५० रुपयांचा एकच पास सुरू ठेवला. तसेच सप्टेबर व ऑक्टोबर २०१७ मध्ये ठराविक मार्गासाठी असलेल्या पासही त्यांनी बंद केला होता. त्यामुळे विद्यार्थी संख्येत घट झाली होती. त्यावर प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंढे यांची बदली झाल्यानंतर पंचिंग पास सुरू केला. पण त्यानंतरही विद्यार्थी पास वाढविण्यात पीएमपी प्रशासनाला यश आलेले नाही.
--
विद्यार्थी पास
इयत्ता ५वी ते १२ वी (पालिका शाळा) - मोफत (ठराविक मार्ग)
खासगी शाळा - ७५ टक्के सवलत
खासगी महाविद्यालये - ५० टक्के सवलत (७५० रुपये)
पंचिंग पास - ठराविक मार्गांसाठी
............
मागील काही वर्षात पीएमपीला उतरली कळा लागली होती. नवीन बस ताफ्यात येत नसल्याने जुन्या बसवरच प्रवाशांची भिस्त होती. त्यामुळे खिळखिळ््या झालेल्या बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागत होता. ब्रेकडाऊन व अपघाताचे प्रमाणही अधिक होते. बस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताव सहन करावा लागत होता. परिणामी विद्यार्थ्यांसाठी इतर प्रवाशांकडूनही पाठ फिरविली जात आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने तसेच शाळा, महाविद्यालयांच्या वेळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांकडून खासगी वाहनांसह स्कुल बस, व्हॅन, रिक्षाचा वापर अधिक वाढू लागला आहे. त्याचा फटका पीेमपीला बसत आहे.मागील वर्षीपासून ताफ्यात नवीन बस दाखल होऊ लागल्या असून खिळखिळ््या झालेल्या बस भंगारात काढल्या जात आहेत. अत्याधुनिक ई-बस प्रवाशांना आकर्षित करत आहेत. आणखी शेकडो नवीन बस येणार असल्याने पीएमपीचा बस ताफा सुसज्ज होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत जाईल, असे पीएमपी अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
..............
मागील काही वर्षातील विद्यार्थी पासची स्थिती
महिना व वर्ष        विद्यार्थी पास संख्या
२०१५
आॅगस्ट               ७०,२३७
सप्टेंबर                 ६७,५०४
आॅक्टोबर            ४६,७७४
---------
२०१६
आॅगस्ट               ६३,८६७
सप्टेंबर                 ६२,८८४
आॅक्टोबर           २३,४९१
-------------
२०१७
ऑगस्ट                ५४,१७५
सप्टेंबर                ४४,५९५
ऑक्टोबर               २४,८८३
---------
२०१८
ऑगस्ट              ४५,२९४
सप्टेंबर               ४५,७५४
ऑक्टोबर           ३०,४३०
------------
२०१९
ऑगस्ट             ४१,३०४
सप्टेंबर              ४२,६८९

Web Title: students stop the journey by ' PMP bus : The number of passes is decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.