ST Strike: संप मोडून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आंदोलनाचे निवारेही उखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 04:32 PM2021-12-05T16:32:10+5:302021-12-05T16:32:17+5:30

संपात सहभागी असलेल्या ८८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यात ३६ चालक, ३५ वाहक, १६ मेकॅनिक व एका प्रशासकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे

ST staff transfers to break the strike the shelters of the movement were also uprooted | ST Strike: संप मोडून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आंदोलनाचे निवारेही उखडले

ST Strike: संप मोडून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या; आंदोलनाचे निवारेही उखडले

Next

पुणे : राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून, तो मोडून काढण्यासाठी आता एसटी प्रशासनाने दंडेलशाही चालविली आहे. संपात सहभागी असलेल्या ८८ कर्मचाऱ्यांच्या शनिवारी बदल्या करण्यात आल्या. यात ३६ चालक, ३५ वाहक, १६ मेकॅनिक व एका प्रशासकीय कर्मचाऱ्याचा समावेश आहे. झालेल्या बदल्या या गैरसोयीच्या असून, कर्मचाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने केल्या असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून आदेश येताच पुणे विभागाने संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी केली. दुपारपर्यंत त्यावर विभाग नियंत्रकाची तातडीने स्वाक्षरी घेऊन तत्काळ बदलीचे आदेश काढण्यात आले. संपात सहभागी असलेल्यांना सध्या नेमून दिलेल्या ठिकाणापासून लांबच्या आगारात पाठवण्यात आले आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र, अशा दंडेलशाहीला घाबरून आम्ही संप थांबवणार नसल्याचे संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

आंदोलनाचा निवाराही उखडला

'स्वारगेट बसस्थानकाच्या ‘आउटगेट’ पाशी एसटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत आंदोलन करत आहेत. अवकाळी पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी आडोसा म्हणून निवारा उभारला होता. हा निवाराही शनिवारी दुपारी एसटी प्रशासनाने काढून टाकला. मंडप काढल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना थंडी-पावसात आंदोलन करावे लागेल आणि त्यामुळे ते लवकर आंदोलन थांबवतील असा होरा एसटी प्रशासनाचा आहे. मात्र, उघड्या आभाळाखालीही आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.'

Web Title: ST staff transfers to break the strike the shelters of the movement were also uprooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.