स्वारगेट बसस्थानकात एसटी प्रवाशांची पळवापळवी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 11:30 PM2019-12-17T23:30:00+5:302019-12-17T23:30:04+5:30

खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट सक्रिय, प्रशासनाचे दुर्लक्ष

ST passengers abducted at Swargate bus station | स्वारगेट बसस्थानकात एसटी प्रवाशांची पळवापळवी

स्वारगेट बसस्थानकात एसटी प्रवाशांची पळवापळवी

googlenewsNext
ठळक मुद्देकमी तिकीट दराचे अमिष दाखवून प्रवाशांना नेले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोरकाही वर्षात खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी आव्हान उभे केल्याने एसटीच्या प्रवाशांमध्ये घट

पुणे : प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. पण बसस्थानकातून एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत खासगी ट्रॅव्हल्सचे एजंट प्रवाशांना पळवून नेत आहेत. याकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात असल्याने एजंटांना मोकळे रान मिळत असल्याची स्थिती स्वारगेट बसस्थानकात आहे. कमी तिकीट दराचे अमिष दाखवून प्रवाशांना नेले जात असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत दिसून आले. 
मागील काहीवर्षात खासगी ट्रॅव्हल कंपन्यांनी आव्हान उभे केल्याने एसटीच्या प्रवाशांमध्ये घट झाली असून उत्पन्नही कमी झाले आहे. यापार्श्वभुमीवर एसटीने त्यांना टक्कर देण्यासाठी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या वातानुकूलित बससेवेचे दरही प्रवाशांच्या आवाक्यात आहेत. आता एसटीने विनावातानुकूलित शयनयान बसही सेवेत आणली आहे. कमी तिकीट दरात प्रवाशांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा एसटीचा प्रयत्न आहे. प्रवासी संख्येत वाढ करणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. पण या उद्देशाला एसटी प्रशासनाकडूनच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे. खासगी ट्रॅव्हल कंपन्यांचे एजंटे बसस्थानकांमध्ये उजळ माथ्याने फिरून प्रवाशांची पळवापळवी करत आहेत. त्याचा फटका एसटीला बसत असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. 
स्वारगेट बसस्थानकामध्ये केलेल्या पाहणीत खासगी ट्रॅव्हलचे एजंटचा मुक्त संचार दिसून आला. या स्थानकातून दादर, ठाणे, बोरीवली, कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, महाबळेश्वर, पाचगणी यांसह विविध ठिकाणी जाण्यासाठी शिवनेरी, शिवशाही, हिरकणी बस उपलब्ध आहेत. बसच्या श्रेणीनुसार त्यांचे तिकीट दर वेगवेगळे आहेत. दादर, ठाण्याला जाण्यासाठी करंट बुकींगसाठी स्वतंत्र खिडक्या आहेत. सांगली, सातारा, कोल्हापुरसाठीही अशीच व्यवस्था आहे. खासगी ट्रॅव्हलचे एजंट थेट याठिकाणी येऊनच प्रवाशांना कमी तिकीट दराचे अमिष दाखवून नेत आहेत. तिथे एसटीचे, चालक, वाहक, बुकींग करणारे कर्मचारी असतात. जवळच आगार प्रमुखांचे कार्यालय आहे. पण या एजंटला कुणीही साधे हटकत नसल्याचेही दिसून आले. सुरक्षारक्षक नेमल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जातो. पण बसस्थानकात दीड तासांत एकही सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी एंजटला हुसकावून लावताना दिसून आला नाही. त्यामुळे ही एजंटगिरी मुक्तपणे सुरू होती. तिकीट खिडकीव रांगेत उभे राहून त्रासलेले प्रवासीही एजंटसोबत जाऊन एसटीला नाकारत असल्याचे चित्र आहे. 
--------------------
ठाणे, दादर व बोरीवलीला जाणाºया शिवनेरी बससाठी अनुक्रमे ४४०, ४६० आणि ५२५ रुपये तिकीट दर आहे. खासगी ट्रव्हल्सकडून केवळ ३०० ते ३५० रुपयांत प्रवाशांना नेले जाते. वाशी, सायन, चेंबुरसाठीही खासगी ट्रव्हल्स उपलब्ध होत आहेत. कोल्हापुरसाठी एसटीचे ४३० रुपये तिकीट असून खासगी ट्रव्हल्सकडून केवळ २५० रुपयांत नेले जात आहे. शिवनेरीपेक्षा १०० ते १५० रुपयांनी तिकीट कमी असल्याने प्रवासीही तिकडे जात आहेत. त्यामुळे एसटी प्रवासी कमी होत असल्याचे चित्र आहे.बसस्थानकामध्ये एजंटांना रोखण्याबाबत पोलिस प्रशासनाला वारंवार पत्र दिली आहेत. तसेच सुरक्षा रक्षकांनाही सुचना दिलेल्या आहे. अधिकारी व कर्मचारीही त्यांना रोखतात. काही जणांवर कारवाईही केली आहे. पण आता पुन्हा काही नवीन एजंट दिसत आहेत. 
- स्वाती आवळे, आगार प्रमुख, स्वारगेट
----------

Web Title: ST passengers abducted at Swargate bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.