ज्येष्ठ-दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 12:44 PM2019-09-06T12:44:35+5:302019-09-06T12:46:03+5:30

मतदानासाठी आल्यानंतर मतदारांना आनंद व समाधान वाटेल याची काळजी घ्यावी...

special take care of senior-and divyang person voters! | ज्येष्ठ-दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष द्या!

ज्येष्ठ-दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष द्या!

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना : आगामी विधानसभा निवडणूक कामांचा घेतला आढावा

पुणे : ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी तळ मजल्यावर मतदान केंद्र निर्माण करावे, मतदानासाठी आल्यानंतर मतदारांना आनंद व समाधान वाटेल याची काळजी घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करावी व त्यांच्या सूचना ध्यानात घ्याव्यात. तसेच अडचणीचे वाटणारे मतदान केंद्र बदलून घ्यावे अशी सूचना भारतीय निवडणूक आयोगाचे वरीष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी गुरुवारी केली. 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांशी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथील मुख्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सिन्हा यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेत प्रशासनाला काही सूचना केल्या. उपनिवडणूक आयुक्त  संदीप सक्सेना, चंद्रभूषण कुमार, महासंचालक (संदेशवाहन आणि समन्वयक) धिरेंद्र ओझा, दिलीप शर्मा व महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह उपस्थित होते.
पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांबरोबरच विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी निवडणूक अधिकाऱ्यांनी चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी व येत असलेल्या अडचणीबाबत त्यांची मते जाणून घेतली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची माहिती दिली. तर, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी विभागातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे मतदान केंद्रांचे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी ते आव्हान असले तरी अशक्य नाही. दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. संवेदनशील मतदान केंद्रावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

Web Title: special take care of senior-and divyang person voters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.