ताई, सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये; राष्ट्रवादीचं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:38 PM2021-04-19T20:38:33+5:302021-04-19T20:39:50+5:30

पुणे : ’सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे. ती आहे राजकारण , ही ...

Sister, not all politicians should be seen through one lens; Reply to actress Tejaswini Pandit by NCP's Cultural Department | ताई, सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये; राष्ट्रवादीचं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला प्रत्युत्तर

ताई, सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये; राष्ट्रवादीचं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला प्रत्युत्तर

googlenewsNext

पुणे : ’सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे. ती आहे राजकारण, ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या किडीपासून बचाव करता आला तर बघा’’, ही अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट भलतीच व्हायरल झाली असून,चर्चेचा विषय ठरली आहे. परिस्थिती किती बिकट आहे हे सांगताना  ‘ अवघड आहे सगळंच....काळजी घ्या’ असा टोला देखील तिने लगावला आहे. मात्र ही बोचरी टीका राष्ट्रवादीच्या चित्रपट,कला आणि सांस्कृतिक विभागाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, या अभिनेत्रीला  ‘सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये ’ असं प्रत्युत्तर विभागाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे.

अभिनेत्री कंगना राणावत ही राजकारण्यांवर विशेषत: सत्ताधारी पक्षावर आगपखड करणारी ट्विट करीत असते. त्यावरून ती सातत्याने ट्रोल देखील होत असते. मात्र आता मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरली आहे.. अनेकांनी तिला पाठिंबा दिला असून, काही जणांनी ट्रोल देखील केले आहे. परंतु, तिची पोस्ट ही कोणा एका पक्षाला उददेशून नसून सुद्धा राष्ट्रवादी च्या चित्रपट,कला आणि सांस्कृतिक विभागाला काहीशी झोंबली आहे. 

तेजस्विनीच्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादी कांग्रेसच्या चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील ’ सर्वच राजकारण्यांना एका पारड्यात ठेवून चांगले काम करणाऱ्या राजकारण्यांना विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण ही बाबच मुळात चुकीची असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री हे रात्रंदिवस एक करून या महामारीत लोकांना वाचवण्यासाठी एकत्र येऊन काम करताना आपण पाहत आहोत. याहीपुढे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आईचे निधन झाल्यानंतरही त्यांनी दु:खाचा क्षण बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आपला परिवार समजून वाचवण्यासाठी कसरत सुरू ठेवली आहे. खरंच त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. 

राजकारणावर टीका करण्यापेक्षा एक कलावंत म्हणून आपण लोकांसाठी काय करू शकतो.याचा विचार करून काहीच नाही तर एक व्हिडिओ करून लोकांनी घरात राहा सुरक्षित रहा असे आवाहन करू शकतो. जेणेकरून प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण येणार नाही. आणि लवकरच कोरोनाची ही संसर्ग साखळी संपुष्टात येऊन येत्या दोन ते तीन महिन्यात आपण पूर्वीसारखं नॉर्मल आयुष्य जगू शकू. त्यामुळे राजकीय व्यवस्थेवर बोलण्यापेक्षा लोकांना आपण किती मदत करतो यावर भर दिला तर त्यांचे सर्वत्र कौतुक होईल असा टोला देखील त्यांनी तेजस्विनीला लगावला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Sister, not all politicians should be seen through one lens; Reply to actress Tejaswini Pandit by NCP's Cultural Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.