सिंहगडावर शिवराज्याभिषेक साेहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 07:25 PM2019-06-16T19:25:04+5:302019-06-16T19:29:55+5:30

तिथीनुसार सिंहगडावर शिवराज्याभिषेक साेहळा साजरा करण्यात आला.

Shivrajyabhishek festival celebreation on sinhagad fort | सिंहगडावर शिवराज्याभिषेक साेहळा

सिंहगडावर शिवराज्याभिषेक साेहळा

Next

पुणे : ‘जय भवानी, जय शिवराय’... ‘हर हर महादेव’... ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’चा अखंड जयघोष...  ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर... भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर शिवरायांना मानवंदना देण्यासाठी जमलेल्या शिवभक्तांचा जनसागर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी, अशा चैतन्यमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेकाचा सुवर्णक्षण साजरा झाला. 

विश्व हिंदू परिषद पुरस्कृत श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्त किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज समीर जाधवराव, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, नगरसेवक प्रसन्न जगताप, सुनील मारणे, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, कार्याध्यक्ष प्रितम बहिरट, उपाध्यक्ष शरद जगताप, केतन घोअडके, संयोजक संपत चरवड, श्रीपाद रामदासी, समीर रुपदे, कोषाध्यक्ष योगेश देशपांडे आदी उपस्थित होते.  

अभिवादन सोहळ्याची सुरूवात राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून ते सिंहगड वाहनतळापर्यंत दुचाकी रॅलीने करण्यात आली. विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकिटवाडी, खडकवासला, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये अभिनेते प्रविण तरडे सहभागी झाले होते. सोहळ्यामध्ये तब्बल २ हजार शिवभक्त सहभागी झाले होते. त्यानंतर सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या पालखीची ढोल-ताशाच्या गजरात हातात भगवे ध्वज घेऊन मिरवणूक काढण्यात आली. सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज समीर जाधवराव यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. यावेळी शाहीर श्रीकांत रेणके यांनी शाहीरी जलसा कार्यक्रमातून शिवरायांना मानवंदना दिली. सिंहगडावरील मंदिरे व समाधीचे पूजन देखील करण्यात आले. 

धनंजय गायकवाड, श्रीकांत चिल्लाळ, अमर सातपुते, दत्ता तोंडे, श्यामसुंदर काब्रा, विद्याधर तांबे, महेश चिलमे, साईनाथ कदम, गणेश वनारसे, राजू कुडले, सागर बेलसरे, सचिन लोखरे, शुभम मुळीक, चैतन्य बोडके, सचिन कांबळे, नितीन महाजन, संजय पवळे, आशुतोष पांडे, निलेश कांबळे, निखील जाधव, ओंकार परदेशी, नाना क्षीरसागर आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. 

Web Title: Shivrajyabhishek festival celebreation on sinhagad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.