सातपाटील कुलवृत्तांत : मराठ्यांच्या सामाजिक घुसळणीचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:07 PM2019-09-23T22:07:10+5:302019-09-23T22:43:26+5:30

छत्रपती शिवाजीमहाराजांसारखा युगपुरुष मराठा समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी नेहमीच स्फूर्तीदायी होता.

Satpatil Dynasty: An Account of the Social Infiltration of the Marathas | सातपाटील कुलवृत्तांत : मराठ्यांच्या सामाजिक घुसळणीचा लेखाजोखा

सातपाटील कुलवृत्तांत : मराठ्यांच्या सामाजिक घुसळणीचा लेखाजोखा

googlenewsNext

-अविनाश थोरात

क्षत्रीय म्हणून सत्ताधारी समाजसमूह असल्याचा दावा करायचा की सामाजिक दृष्टया मागास असल्याचे मान्य करून आरक्षणाचा लाभ घ्यायचा या द्वंदात मराठा समाज अनेक वषे होता. मात्र, लाखोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चांनी हे द्वंद मिटविले. सामाजिक मागास म्हणनू  मराठा समाजाने आरक्षण स्वीकारले. यामागची आर्थिक आणि सामाजिक कारणमिंमासा रंगनाथ पठारे यांच्या ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या महाकादंबरीत करण्यात आली आहे. एका अर्थाने मराठ्यांच्या सुमारे आठशे वर्षांच्या सामाजिक घुसळणीचा लेखाजोखाच पठारे यांनी मांडला आहे.


छत्रपती शिवाजीमहाराजांसारखा युगपुरुष मराठा समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी नेहमीच स्फूर्तीदायी होता. परंतु, शिवाजीमहाराजांच्या अगदी भराच्या काळातही त्यांचे राज्य काही जिल्ह्यांपुरते सिमित होते. त्याच्यापलीकडेही मराठा समाज होता. मात्र, आपल्याकडील बहुतांश ऐतिहासिक लिखाण हे शिवकाळाचाच वेध घेते. देवगिरीच्या रामदेवदरायाच्या राज्याच्या कहाण्या ऐकत असतो; अल्लाउद्दीन खिलजीने केलेल्या हल्याने व्यथित होत असतो. परंतु, त्या काळातील सामान्य जनांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक स्थितीविषयी लिहिले गेले नाही. कादंबरीय कल्पनारुपाने का होईना तेथपासूनच्या इतिहासाचा पठारे यांनी धांडोळा घेतला आहे. मुख्यत: समाजातील अगदी तळातल्या वर्गाचे जीवन रेखाटले आहे. देशमुखी, पाटीलकी यामुळे मराठा समाजाचे एक चित्र तयार झालेले आहे. परंतु, याच्या पलीकडेही फार मोठा समाज आहे. हा समाज इतर कोणत्याही इतर जातींप्रमाणेच जगत होता आणि जगत आहे.

विपरित निसर्गाशी लढताना शेती करायची, शिपाईगडी म्हणून प्राणाची पर्वा न करता मुलुखगिरी करायला जायचे यामुळे लढवय्यी जात म्हणून मराठे प्रसिध्द झाले तरी त्यांच्या आर्थिक स्थितीत फारसा फरक पडला नाही. एखाद्या कर्तृत्ववानाने नाव काढले; पण काळाच्या ओघात त्याचा कुणबा वाढला आणि पुन्हा मुळ स्थितीत आले. ही मराठा समाजाची आजवरची कहाणी पठारे यांनी मांडली आहे.
पण त्यापेक्षाही आजच्या धार्मिक कट्टरतेच्या  वातावरणात ही कादंबरी महत्वपूर्ण आहे. ते यासाठी  की सुमारे पाचशे ते सहाशे वर्षांचा मुसलमान आमदनीतील काळ रेखाटतानाचे सामाजिक वास्तव मांडले आहे. इथल्या सामान्य जनांनी मुस्लिमांकडे केवळ आक्रमक म्हणून पाहिले नाही. अल्लाउद्दीन खिलजीपासून ते निजामशाही, आदिलशाही, मोगल आणि नंतर अगदी अब्दालीपर्यंतच्या काळात समाजावर बळजोरी झाली.पण त्यामध्ये व्यक्तींचा दोष होता. मुस्लिम राज्यकर्ते आपल्या फायद्यासाठी का होईना येथील लोकांना धरून राहिले.


एका सातपाटलाच्या प्रेमात पडलेली अफगाण सरदाराची विधवा. पध्दतशीरपणे पैसे गुंतवते, या तरुणाला घेऊन निजामशाहीतून आदिलशाहीत पुण्यात येते. मराठी म्हणून राहते. युक्तीने गाव वसविण्याची कल्पना आणि ताकद देते. आपल्या अफगाण मुलाला मराठी म्हणून वाढविते. पुन्हा पतीला घेऊन आपल्या मुलखात जाते आणि तेथे पतीला अफगाण बनविते. तिच्याच वंशातील दुसरी अफगाण स्त्री अब्दालीचा सैनिक म्हणून आलेल्या मराठी तरुणाला घेऊन महाराष्ट्रात येते. मराठी बनून त्याचा वंश वाढविते. मराठी- अफगाण संबंधांचे हे हळुवार वर्णन ही कादंबरीची खरी ताकद आहे. हिंदू-मुस्लिम रोटी व्यवहार काही प्रमाणात झाले; पण बेटी व्यवहार झाले नाहीत. मात्र, तरीही सातशे-आठशे वर्षांच्या काळात वर्णसंकर होणारच. दख्खनी मुस्लिमांनी अनेक जण तर येथील ऐत्तदेशिय पण येथील सामान्य जनांनी अगदी अफगाणही येथे फार परके मानले गेले नाहीत.


 उत्तर पेशवाईच्या काळात नाना फडणवीस यांनी मराठा सरदारांना आपल्या अंकित करण्याचा प्रयत्न केला. अगदी छत्रपतींच्या दोन्ही गाद्यांनाही खर्चासाठी त्यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. पण ग्रामीण महाराष्ट्राने मात्र ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद कधी मानला नाही. शहरांमध्ये वाद झाले. पण, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चित्र वेगळे होते. येथील ब्राम्हण समाजही एकरुप झालेला होता. बहुजन समाजाप्रमाणेच जीवन जगत होता, हे पठारे यांनी मांडले आहे.


कोणतीही कादंबरी हे एक प्रकारे लेखकाचे आत्तवृत्त असते, असे स्वत: रंगनाथ पठारे यांनीच म्हटले आहे.  कादंबरीतील लेखक आपली मुळे (रुटस) शोधण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत मराठी साहित्यात हा प्रयत्न कधीच झाला नाही. पठारे यांनी तो केला आहे. तब्बल २० वर्षे अभ्यास करून तब्बल आठशे वर्षांच्या काळाच सामाजिक पटच त्यांनी मांडला आहे.

Web Title: Satpatil Dynasty: An Account of the Social Infiltration of the Marathas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.