‘ससून ’इमारतीला हवा बुस्टर डोस; बारा वर्षांपासून काम रेंगाळलेलेच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 08:34 PM2020-05-28T20:34:58+5:302020-05-28T20:38:17+5:30

एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना ससूनची क्षमता मात्र आहे..

‘Sassoon’ building necessary 'booster' dose; The work has been in slow motion for twelve years | ‘ससून ’इमारतीला हवा बुस्टर डोस; बारा वर्षांपासून काम रेंगाळलेलेच

‘ससून ’इमारतीला हवा बुस्टर डोस; बारा वर्षांपासून काम रेंगाळलेलेच

Next
ठळक मुद्दे२००८ मध्ये ससुन रुग्णालयाच्या आवारात ११ मजली इमारतीचे सुरू झाले काम ससूनची क्षमता वाढल्यास हे सर्वात मोठे कोविड रुग्णालय ठरेल

पुणे : ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीला कोरोना विषाणुच्या संसगार्मुळे मुहूर्त मिळाला खरा पण त्यानंतरही लालफितीचा फटका बसतच आहे. मागील दीड महिन्यांपुर्वी कोरोनाबाधित रुग्णांवर या इमारतीत उपचार सुरू झाल्यानंतर तेथील क्षमता अद्याप वाढलेली नाही. एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना ससूनची क्षमता मात्र आहे तेवढी असल्याने खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असल्याची सध्याची स्थिती आहे.

नवीन इमारतीची व्यथा
ससुन रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवरील वाढता ताण आणि रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २००८ मध्ये ससुन रुग्णालयाच्या आवारात ११ मजली इमारतीचे काम सुरू झाले. पुढील चार-पाच वर्षांत हे काम पुर्ण होणे अपेक्षित होते. पण निविदा प्रकियेतील घोळ, सातत्याने मिळणारी मुदतवाढ, निधीची कमतरता आदी कारणांमुळे हे काम तब्बल १२ वर्ष रेंगाळत गेले. बारामतीमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे काम त्यानंतर काही वर्षांनी सुरू होऊनही आता तिथे वर्षभरापुर्वीच शैक्षणिक सत्रही सुरू झाले.

.......................................

कोरोना पथ्यावर...
कोरोना विषाणुचा संसर्ग होण्यापुर्वी इमारतीमध्ये सुविधा निर्माण करण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. पण कोरोनाच्या पार्श्वभुमीवर या इमारतीला कोविड हॉस्पीटलचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाधित रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार व्हावेत, हा त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे विक्रमी वेळेत ५० बेडचा आयसीयु आणि १०० बेडचा विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. आॅक्सीजनची सुविधा कार्यान्वित करण्यात तर जागतिक विक्रम केल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे महिनाभरातच या रुग्णालयातील चार मजल्यांवर रुग्णसेवा सुरू झाली. हीच गती मागील काही वर्षांत राहिली असती तर आज खासगी रुग्णालयांसमोर हात पसरण्याची वेळ प्रशासनावर आली नसती अशी चर्चा रुग्णालयात सुरू आहे.

...........................................

... तर एकाच ठिकाणी उपचार
ससुनच्या नवीन इमारतीध्ये अतिदक्षता विभाग तसेच विलगीकरण कक्षाची क्षमता वाढल्यास अनेक रुग्णांवर एकाच ठिकाणी उपचार करणे शक्य होईल. सध्या नायडू, ससुनसह महापालिकेचे काही दवाखाने, शैक्षणिक संस्थांचे वसतिगृह, अन्य इमारती, अनेक खासगी रुग्णालये आदी ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यामुळे नियोजन करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. प्रामुख्याने मध्यम व गंभीर स्वरूपाची लक्षणे असलेले तसेच अन्य अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचाराची गरज भासत आहे. या रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यांच्यावर नायडू, ससूनसह अन्य एक-दोन खासगी रुग्णालयांमध्येही सहजपणे उपचार होऊ शकतात. ससूनची क्षमता वाढल्यास हे सर्वात मोठे कोविड रुग्णालय ठरेल.
--------------------
कामाला मंजुरी, वेळेत होणार का?
नवीन इमारतीच्या ४ ते ७ मजल्यांची कामे सध्या करण्यात आलेली आहेत. सातव्या मजल्यावर अतिदक्षता कक्ष आहे. तसेच पाचव्या व सहाव्या मजल्यावर विलगीकरण कक्ष आहेत. उर्वरीत मजल्यांवर ऑक्सिजन यंत्रणा, ऑपरेशन थिएटर आदी सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे ४६ कोटी रुपयांच्या तीन निविदांना मंजुरी देण्यात आली आहेत. तसेच अतिदक्षता विभागाची क्षमताही वाढविली जाणार आहे. त्यानुसार सार्वजनिक विभागाकडून लवकरच काम सुरू होईल. कोरोना रुग्णांसाठी प्राधान्याने काम पुर्ण केले जाईल. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. ही यंत्रणा कायमस्वरूपी असणार आहे. त्यासाठी तीन वेगवेगळ्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. त्यानुसार कामांना मंजुरी मिळाली आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: ‘Sassoon’ building necessary 'booster' dose; The work has been in slow motion for twelve years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.